न्यायतत्व शास्त्राचा अभ्यास करावा
By Admin | Published: January 15, 2017 11:24 PM2017-01-15T23:24:08+5:302017-01-15T23:27:27+5:30
उस्मानाबाद : कायदा काय आहे ? यापेक्षा कायदा का आला ? याचे उत्तर शोधण्यासाठी तरूण वकिलांनी न्यायतत्व शास्त्राचा अभ्यास करावा, असे प्रतिपादन अॅड़ उज्वल निकम यांनी केले.
उस्मानाबाद : कायदा काय आहे ? यापेक्षा कायदा का आला ? याचे उत्तर शोधण्यासाठी तरूण वकिलांनी न्यायतत्व शास्त्राचा (ज्युरिस्प्रूडन्स) व्यापक अभ्यास करावा, असे प्रतिपादन विशेष सरकारी वकील पद्मश्री अॅड़ उज्वल निकम यांनी केले.
येथील जिल्हा विधीज्ञ मंडळाच्यावतीने मोरे ग्रंथालय सभागृहात शनिवारी प्रेरणादायी विधीज्ञांच्या स्मरणार्थ ‘क्रिमिनल ट्रायल’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष अॅड़ अजित खोत होते. यावेळी उपाध्यक्ष अभय पाथ्रुडकर, विश्वजित शिंदे, कोषाध्यक्ष अनिल पाटील, सहसचिव आबासाहेब जाधव, सुहास गरड, महिला प्रतिनिधी आशा टेळे, जिल्हा सरकारी वकील अॅड़ जाधवर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रत्येक वकील हा न्यायव्यवस्थेतील विद्यार्थी असतो हे वकीलाचे वैशिष्ट्य! कायदा आपल्याला नेहमी शिकवितो. काम करताना वकिलांनी आत्मविश्वासाने आणि अभ्यास करूनच बोलले पाहिजे. चुका झाल्या तर मोठ्या मनाने मान्य करायला शिकले पाहिजे, असे ते म्हणाले. प्रारंभी पद्मश्री अॅड़ उज्वल निकम यांचा जिल्हा विधीज्ञ मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक अध्यक्ष अॅड़ अजित खोत यांनी केले. श्रीकांत कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले़ (प्रतिनिधी)