पोलिसांच्या पाल्यांसाठी अभ्यासिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 12:58 AM2017-10-22T00:58:11+5:302017-10-22T00:58:11+5:30
पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचा-यांच्या मुलांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पोषक वातावरण मिळावे यासाठी येथील सर्व्हे क्रमांक ४८८ मधील पोलीस वसाहतीत ‘यशवंत’ अभ्यासिका सुरू करण्यात आली
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचा-यांच्या मुलांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पोषक वातावरण मिळावे यासाठी येथील सर्व्हे क्रमांक ४८८ मधील पोलीस वसाहतीत ‘यशवंत’ अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी विविध प्रकारच्य पुस्तके व अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या अभ्यासिकेचे शुक्रवारी उद्घाटन झाले. या वेळी पोलीस उपअधीक्षक अभय देशपांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर आदींची उपस्थिती होती. यावेळी पोकळे म्हणाले, की कायम कर्तव्यावर असणाºया पोलीस दलातील अधिकारी कर्मचाºयांना इच्छा असूनही आपल्या पाल्यांना पुरेसा वेळ देणे शक्य होत नाही. त्यामुळे मुलांचा अभ्यास व अन्य जबाबदाºया महिलांवर येतात. पोलीस पाल्यांना अभ्यासाकरिता चांगले वातावरण मिळावे या उद्देशाने ही अभ्यासिका सुरू करण्यात आली असून, याचा मुलांनी फायदा घ्यावा. पोलीस अधिकारी व कर्मचा-यांसाठी अद्ययावत व्यायाम शाळा उभारण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. अन्य अधिका-यांनी या वेळी आपले मनोगत व्यक्त केले. पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी आयोजित दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात सर्वांनी सहभाग घेतला.