छत्रपती संभाजीनगरातील प्रत्येक वाॅर्डात स्थापन होणार आता अभ्यासिका; पालकमंत्री भुमरेंची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 12:23 PM2023-04-11T12:23:34+5:302023-04-11T12:23:59+5:30

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची सूचना

Study rooms will now be established in every ward of Chhatrapati Sambhajinagar; Announcement by Guardian Minister Sandipan Bhumare | छत्रपती संभाजीनगरातील प्रत्येक वाॅर्डात स्थापन होणार आता अभ्यासिका; पालकमंत्री भुमरेंची घोषणा

छत्रपती संभाजीनगरातील प्रत्येक वाॅर्डात स्थापन होणार आता अभ्यासिका; पालकमंत्री भुमरेंची घोषणा

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकार करण्यासाठी शहरातील प्रत्येक वाॅर्डात अभ्यासिका स्थापन करण्याची घोषणा पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी शांतता समितीच्या बैठकीत सोमवारी केली. त्याविषयीची केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सूचना केली होती.

तापडिया नाट्यमंदिर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शांतता समितीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीचा अध्यक्षीय समारोप करताना डॉ. कराड म्हणाले, १४ एप्रिलच नव्हे तर १३ एप्रिलासुद्धा ड्राय डे असावा, त्यासाठी उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांकडे मागणी करणार आहे. बाबासाहेबांच्या १३२व्या जयंतीचे औचित्य साधून वाॅर्डा-वाॅर्डांत त्यांच्या नावाने १३२ अभ्यासिका उघडल्या पाहिजेत. बाबासाहेबांनी शहरात शैक्षणिक संकुल उभारले. त्यात मराठवाड्यासह विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले. माझ्यासारखा शेतकऱ्याचा मुलगाही शिक्षणामुळे डॉक्टर बनला. त्यानंतर नगरसेवक, महापौर, खासदार आणि केंद्रीय मंत्रीही बनू शकला. अनेक मुलांना घरात अभ्यास करता येत नाही. त्यासाठी अभ्यासिकांची गरज आहे. या अभ्यासिकांसाठी पालकमंत्र्यांनी लक्ष घातले पाहिजे. त्यावर उत्तर देताना पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी शहरातील ११५ वॉर्डांत बाबासाहेबांच्या नावाने अभ्यासिका उघडण्याची घोषणा केली. तेव्हा उपस्थित आंबेडकरी समुदायाने जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला. आमदार संजय शिरसाठ, आमदार प्रदीप जैस्वाल यांच्यासह सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राजू शिंदे, बाबूराव कदम यांच्यासह इतरांनी बैठकीत सूचना मांडल्या.

...तर बंगल्याचे रूपांतर स्मारकात होणार
यावेळी बोलताना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड म्हणाले, बाबासाहेबांचे पाय या भूमीला लागले आहेत. छावणीतील बंगला नंबर ९ मध्ये बाबासाहेबांचे वास्तव्य होते. तो बंगला संरक्षित करीत त्यास स्मारकाचा दर्जा देण्यासाठी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी राज्य शासनाकडून स्मारकासंदर्भात प्रस्ताव आल्यास तत्काळ निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे पालकमंत्र्यांनी राज्य शासनाकडून बाबासाहेबांनी वास्तव्य केलेल्या बंगल्याचे स्मारकात रूपांतर करण्याचा प्रस्ताव केंद्राला पाठवावा. त्यास मंजुरी आणण्याचे काम आपण करणार असल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले.

Web Title: Study rooms will now be established in every ward of Chhatrapati Sambhajinagar; Announcement by Guardian Minister Sandipan Bhumare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.