स्टंटबाजी दारुड्याच्या अंगलट; नदीच्या पुरात वाहून जाताना दोघांनी साहसाने वाचवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 07:44 PM2020-07-27T19:44:30+5:302020-07-27T19:53:17+5:30
तरुणाला पुराच्या पाण्यात आंघोळ करण्याचा मोह झाला आणि त्याने कोणाचेही न ऐकता सरळ पाण्यात उडी घेतली.
सिल्लोड/अंधारी : सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथील एका तरुणाने आंघोळ करण्यासाठी स्टंट करून भोरडी नदीच्या पुरात उडी घेतली. ही स्टंटबाजी त्याच्या चांगलीच अंगलट येऊन तो वाहून जाऊ लागला. यावेळी गावातील दोन तरुणांनी पुराच्या पाण्यात उडी घेऊन बाहेर काढल्याने त्याचा जीव वाचला. समाधान माधवराव वानखेडे (२२), असे तरुणाचे नाव आहे.
सिल्लोड तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. तालुक्यातील सर्व नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. अंधारी येथील भोरडी नदीही पुरामुळे दुथडीभरून वाहत आहे. शनिवारी सायंकाळी सहा वाजेदरम्यान समाधान वानखेडे या तरुणाला पुराच्या पाण्यात आंघोळ करण्याचा मोह झाला आणि त्याने कोणाचेही न ऐकता सरळ पाण्यात उडी घेतली. काही वेळ तो पोहला. मात्र, पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला. ही बाब त्याचा स्टंट पाहणाऱ्या नदीकाठावरील लोकांच्या लक्षात आली.
यावेळी गावातीलच अक्षय विध्वंस (२५, सर्पमित्र) व नवनाथ तायडे (२५) या तरुणांनी क्षणाचाही विचार न करता, एका वाहनावरील दोरखंड ओढले व बाकी लोकांच्या मदतीने त्यांनी दोरी पाण्यात सोडून पुराच्या पाण्यात उड्या घेतल्या. स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यांनी त्याला पाण्याबाहेर काढले. त्याच्या पोटावर दाब देऊन पाणी बाहेर काढल्यानंतर त्याचा जीव वाचला. अक्षय विध्वंस व नवनाथ तायडे या तरुणांनी दाखविलेल्या साहसाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या घटनेचा व्हिडिओ गावातील काही तरुणांनी सोशल मीडियावर टाकला. काळजाचा ठोका चुकविणाऱ्या काही मिनिटांच्या या थराराची तालुक्यात रविवारी सगळीकडे चर्चा होती.
ग्रामस्थांनी सांगितले, तो दारूच्या नशेत होता
पुरामुळे नदीचे रौद्ररूप पाहण्यासाठी गावातील अनेक जण नदीकाठी उपस्थित होते. अशा वेळी समाधान नदीत उडी घेत असताना अनेकांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने कोणाचेही ऐकले नाही. यावेळी तो दारूच्या नशेत होता आणि नशेतच त्याने पुरात उडी घेतल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. पुराच्या खळाळल्या पाण्यात उडी घेतल्यानंतर तो ज्यावेळी गटांगळ्या खाऊन वाहून जाऊ लागला, तेव्हा सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला होता. यात दोन तरुणांनी साहस दाखविल्याने त्याचा जीव वाचला.
सिल्लोड पोलिसांनी केला तरुणांचा सत्कार
दोन्ही तरुणांच्या धाडसाचे कौतुक करून उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंडे , सहायक पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी अक्षय विध्वंस, नवनाथ तायडे यांचा सत्कार केला. यावेळी फौजदार विकास आडे, कर्मचारी विष्णू पल्हाळ अंधारी येथील पोलीस पाटील, शिक्षक तायडे हे हजर होते.