साडेआठ लाख घेताना उपविभागीय अधिकारी जेरबंद;‘एसीबी’चा जलसंधारण कार्यालयासमोर छापा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 12:33 PM2023-02-07T12:33:43+5:302023-02-07T12:36:04+5:30

आरोपी ऋषिकेश देशमुख हा कार्यालयासमोर उभ्या स्वत:च्या आलिशान गाडीमध्येच साडेआठ लाख रुपये मोजून घेत होता. त्याचवेळी एसीबीच्या पथकाने छापा मारला.

Sub-divisional officer Rushikesh Deshmukh jailed for taking eight and a half lakh bribe; ACB raid in front of water conservation office | साडेआठ लाख घेताना उपविभागीय अधिकारी जेरबंद;‘एसीबी’चा जलसंधारण कार्यालयासमोर छापा

साडेआठ लाख घेताना उपविभागीय अधिकारी जेरबंद;‘एसीबी’चा जलसंधारण कार्यालयासमोर छापा

googlenewsNext

औरंगाबाद : परभणी जिल्ह्यातील कंत्राटदाराचे १ कोटी ३७ लाख रुपयांचे देयक काढण्यासाठी व्यवस्थापकीय संचालकाचे साडेसात टक्के आणि कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी ५० हजार रुपये असे ८ लाख ५३ हजार २५० रुपये लाच घेताना जलसंधारण विभागाचा उपविभागीय अधिकारी व लिपिक या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. ही कारवाई औरंगाबाद जलसंधारण कार्यालयासमोर सोमवारी सायंकाळी करण्यात आली.

उपविभागीय अधिकारी ऋषिकेश प्रल्हादराव देशमुख (३४, जलसंधारण विभाग, औरंगाबाद) आणि लिपिक भाऊसाहेब दादाराव गोरे (जलसंधारण कार्यालय) अशी लाच घेताना पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. एसीबीचे अधीक्षक संदीप आटोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने चौंडेश्वरी कन्स्ट्रक्शन कंपनी, परभणीच्या नावावर गवळी पिंपळी (ता. सोनपेठ, जि. परभणी) आणि गोविंदपूर (ता. पूर्णा, जि. परभणी) येथे दोन कोल्हापुरी बंधारे बांधले आहेत. त्यातील गवळी पिंपळीच्या बंधाऱ्याचे १८ लाख रुपये आणि गोविंदपूरच्या बंधाऱ्याचे १ कोटी १९ लाख रुपयांचे देयक काढण्यासाठी उपविभागीय अधिकारी ऋषिकेश देशमुखने महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील कुशिरे यांच्यासाठी ७.५ टक्क्यांप्रमाणे ८ लाख ३ हजार २५० रुपये आणि महामंडळ कार्यालयाचे मिळून ५० हजार रुपये असे ८ लाख ५३ हजार २५० रुपये लाचेची मागणी केली होती.

एवढी मोठी रक्कम लाच देण्याची तयारी नसल्यामुळे तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदवली. जालना येथील एसीबीचे निरीक्षक शंकर मुटेकर यांच्या पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील जलसंधारणच्या कार्यालयासमोर सापळा रचला. तेथेच ८ लाख ५३ हजार २५० रुपयांची लाच घेताना पथकाने देशमुख व गोरे या दोघांना रंगेहाथ पकडले. या दोघांच्या विरोधात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक शंकर मुटेकर, अंमलदार गजानन कांबळे, जमधडे, बुजाडे, खंदारे, गिराम यांच्या पथकाने केली.

पैसे मोजून घेतानाच पकडले
आरोपी ऋषिकेश देशमुख हा कार्यालयासमोर उभ्या स्वत:च्या आलिशान गाडीमध्येच साडेआठ लाख रुपये मोजून घेत होता. त्याचवेळी एसीबीच्या पथकाने छापा मारला. त्यामुळे कार्यालयाच्या परिसरात एकच खळबळ उडाली. आरोपींना पकडल्यानंतर तात्काळ एसीबीच्या कार्यालयात नेण्यात आले.

अनेकांच्या वसुलीचे काम
दरम्यान, उपविभागीय अधिकारी ऋषिकेश देशमुख हा अनेक राजकीय नेते, वरिष्ठ अधिकारी आणि मंत्र्यांसाठी काही वर्षांपासून ‘कलेक्शन’चेच काम करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे एसीबीच्या कारवाईमुळे यात अनेक बडे मासे गळाला लागण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

भूमी अभिलेखचा उपअधीक्षक पकडला
एसीबीच्या औरंगाबाद पथकाने गंगापूर तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयाचा उपअधीक्षक साळोबा लक्ष्मण वेताळ (५१) याला ३० हजार रुपयांची लाच घेताना सोमवारी रंगेहाथ पकडले. यातील तक्रारदाराच्या शेतीची मोजणी करण्यासाठी ४० हजार रुपये लाचेची मागणी वेताळने केली होती. तडजोडीअंती ३५ हजार रुपयांत व्यवहार ठरला. मात्र, तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतल्यानंतर उपअधीक्षक गोरख गांगुर्डे यांच्या पथकाने सापळा रचला. या सापळ्यात वेताळ हा ३० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडला गेला. त्याच्याविरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती अधीक्षक संदीप आटोळे यांनी दिली.

 

Web Title: Sub-divisional officer Rushikesh Deshmukh jailed for taking eight and a half lakh bribe; ACB raid in front of water conservation office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.