उपकुलसचिव ईश्वर मंझा अटकेत;५ दिवस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 01:28 AM2018-02-21T01:28:59+5:302018-02-21T05:43:13+5:30

नोकरीचे आमिष दाखवून ३ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. ईश्वरसिंग रायभान मंझा यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी अटक केली.

Sub-registrar Manza arrested | उपकुलसचिव ईश्वर मंझा अटकेत;५ दिवस कोठडी

उपकुलसचिव ईश्वर मंझा अटकेत;५ दिवस कोठडी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : नोकरीचे आमिष दाखवून ३ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. ईश्वरसिंग रायभान मंझा (५१) यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी अटक केली. न्यायालयासमोर उभे केले असता २४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.
चिकलठाण (ता. कन्नड) येथील शेतकरी देवनाथ माणिक चव्हाण हे १२ वी उत्तीर्ण झालेला त्यांचा भाऊ विजय चव्हाण यास नोकरी लावण्याचा प्रयत्न करीत होते. नंदनवन कॉलनीतील सतीश इंगळे हा चव्हाणांचा मित्र आहे. इंगळेने चव्हाणला सांगितले की, जयश्री आंबेवाडीकर यांची ईश्वरसिंग मंझा यांच्याशी चांगली ओळख आहे. मंझानी अनेकांना नोक-या लावल्या आहेत. सप्टेंबर २०१५ला चव्हाण यांनी इंगळेसह आंबेवाडीकर यांची भेट घेतली. आंबेवाडीकर यांनी मंझा यांना फोन करून घरी बोलावले. विद्यापीठात सहायक कारकून म्हणून नोकरी लावण्यासाठी मंझाने ६ लाख रुपये मागितले. चव्हाण यांनी २५ आॅक्टोबर २०१५ला आंबेवाडीकर यांच्या घरी मंझा यांना ३ लाख रुपये दिले. उर्वरित ३ लाख रुपये आॅर्डर मिळाल्यानंतर देण्याचे ठरले होते.
पैसे देऊन तीन महिने उलटल्यानंतरही नोकरी न लागल्याने चव्हाण त्रस्त झाले. त्यांनी मंझाकडे पैसे परत करण्याची मागणी केली. पाठपुराव्यानंतर मंझा यांनी ३ लाखाचा धनादेश चव्हाण यांना ११ जानेवारी २०१७ रोजी दिला, तो वठला नाही.
धनादेश न वटल्याने चव्हाण यांनी पैशांची मागणी केली असता, ‘पैसे परत करणार नाही, तुला काय करायचे ते कर’, अशी अरेरावीची भाषा मंझा यांनी वापरली. चव्हाण यांनी अखेर छावणी पोलिसांकडे धाव घेतली. गुन्हा दाखल झाल्यानंतर मंझा यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. मंझा सध्या विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपकेंद्रात उपकुलसचिव असून, मंझा यांच्याकडून अधिक प्रकरण उघड होणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले यांनी दिली.

Web Title: Sub-registrar Manza arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.