सुभाष झांबड यांना काँग्रेसतर्फे औरंगाबाद लोकसभेसाठी उमेदवारीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 12:22 AM2018-02-01T00:22:14+5:302018-02-01T00:22:27+5:30
औरंगाबाद- जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे विधान परिषदेचे सदस्य सुभाष झांबड यांचे काम चांगले असून, त्यांचा सर्व तालुक्यांमध्ये चांगला संपर्क आहे. ते जनतेत मिसळतात, जनतेचे प्रश्न समजावून घेतात व ते सोडविण्यासाठी झटतात. त्यामुळे औरंगाबाद लोकसभेची काँग्रेसची उमेदवारी त्यांना दिल्यास ते निश्चितपणे जिंकतील, अशा शब्दात आज येथे काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांच्याकडे व्यक्त केल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : औरंगाबाद- जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे विधान परिषदेचे सदस्य सुभाष झांबड यांचे काम चांगले असून, त्यांचा सर्व तालुक्यांमध्ये चांगला संपर्क आहे. ते जनतेत मिसळतात, जनतेचे प्रश्न समजावून घेतात व ते सोडविण्यासाठी झटतात. त्यामुळे औरंगाबाद लोकसभेची काँग्रेसची उमेदवारी त्यांना दिल्यास ते निश्चितपणे जिंकतील, अशा शब्दात आज येथे काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांच्याकडे व्यक्त केल्या.
आज दुपारपासून स्वत: चव्हाण यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री, गंगापूर, पैठण, कन्नड, वैजापूर व सिल्लोड या विधानसभा मतदारसंघवार कार्यकर्त्यांची मनोगते जाणून घेतली. यावेळी माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह प्रमुख पदाधिकाºयांची उपस्थिती होती. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार हे सूत्रसंचालन करीत होते व योग्य त्या सूचना देत होते. त्या- त्या तालुका काँग्रेसच्या अध्यक्षांनी अशोकराव यांचे स्वागत केले.
फुलंब्रीपासून सुरुवात झाली. नंतर गंगापूर, कन्नड व पैठण, अशी चर्चा झाली. वैजापूर आणि सिल्लोड या दोन्ही तालुक्यांची एकत्रित बैठक झाली.
निवडून येण्यासाठी काय केले पाहिजे, आज काँग्रेसची काय परिस्थिती आहे, या मुद्यांभोवती ही चर्चा फिरत होती. सिल्लोडची जागा अब्दुल सत्तार यांच्या रुपाने आजच निवडून आल्यात जमा आहे, असे सिल्लोडच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. तर वैजापूर व अन्य तालुक्यांतील कार्यकर्त्यांनी सुभाष झांबड हे लोकसभेसाठी कसे योग्य उमेदवार राहतील, हे पटवून दिले.
पैठणची चर्चा सुरू असताना अशोकराव हे पैठणचेच भूमिपुत्र आहेत. पैठणहून स्वत: त्यांनीच निवडणूक लढवावी, असे मत अब्दुल सत्तार यांनी नोंदविले. त्यावर अनिल पटेल उद्गारले, या प्रस्तावाला मी देऊ का पाठिंबा....! मग अशोकराव बोलते झाले, ‘माझं नांदेडला चांगलं चालू आहे. इकडे येण्याचा प्रश्नच नाही. फार तर मी पैठणचा अतिरिक्त आमदार आहे, असे समजा’. त्यावर सभागृहात एकच हंशा पिकला.
ओबीसींवर अन्याय नको
पैठणचे बाबासाहेब पवार यांनी आरोप केला की, ओबीसीच्या जागेवर मूळ ओबीसींना डावलले जाते व जे कुणबी मराठा आहेत, त्यांना तिकिटे देऊन मूळ ओबीसींवर अन्याय केला जातो. या मताशी अशोकराव चव्हाण यांनी सहमती दर्शविली. भिकाजी आठवले यांनी विद्यमान जिल्हा अध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्या कार्यशैलीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या दोघांमध्ये यावेळी शाब्दिक चकमकही झाली.