नियोजनाचा विषय : फुलंब्री तालुक्यात ३८ टक्के तरुणांना मिळाली ग्रामपंचायतीत संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:05 AM2021-01-22T04:05:57+5:302021-01-22T04:05:57+5:30
फुलंब्री : तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत बहुतांश ठिकाणी अनुभवी उमेदवारांनाच जास्त पसंती देण्यात आली आहे. तरीही ३८ टक्के ...
फुलंब्री : तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत बहुतांश ठिकाणी अनुभवी उमेदवारांनाच जास्त पसंती देण्यात आली आहे. तरीही ३८ टक्के तरुणांचा प्रथमच राजकारणात प्रवेश झाला असून, विकासासाठी ही एक नांदी समजली जात आहे. तालुक्यात १० टक्केच ज्येष्ठ नागरिकांना मतदारांनी पसंती दिल्याचे ग्रामपंचायत निवडणुकीवरून दिसून आले. तसेच ३५ ते ४५ या वयोगटातील २२२ अनुभवी उमेदवारांना पसंती मिळाली असून ही टक्केवारी ५१.३८ आहे.
तालुक्यात ५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत्या. यांतील चार ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आल्या; तर ४९ ग्रामपंचायतींच्या ४३२ जागांसाठी मतदान घेण्यात आले. यंदा ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर तरुणांनी सहभाग घेतल्याचे दिसून आले. मात्र मतदारांनी तरुणांपेक्षा अनुभवी तथा ३५ ते ४५ या वयोगटातील उमेदवारांवरच जास्त विश्वास ठेवल्याचे दिसून आले. या वयोगटातील निवडून आलेल्या उमेदवारांची संख्या २२२ आहे; तर २३ ते ३५ वयोगटातील १६५ तरुणांना मतदारांनी पसंती दिली आहे. ही टक्केवारी ३८ टक्क्यांच्या घरात आहे; तर तालुक्यात केवळ ४५ ज्येष्ठ उमेदवार निवडून आले आहेत.
चौकट
या गावांत सर्वाधिक तरुण उमेदवार विजयी
तालुक्यातील वारेगाव, कान्होरी, वाहेगाव, वाघोळा, वानेगाव, पिंपळगाव गांगदेव, सांजूळ, गणोरी या गावांत सर्वाधिक तरुणांना ग्रामपंचायत निवडणुकीत संधी मिळाली आहे; तर वडोदबाजार, टाकळी कोलते, निधोना, बाबरा, धानोरा येथे सर्वाधिक ३५ ते ४५ वयोगटातील उमेदवार निवडून आले आहेत.
चौकट
नवउमेदवारांचे व्हिजन
येथून पुढे शहरांप्रमाणेच गावेही विकासाची केंद्रे ठरावीत यासाठी विकासात्मक कामे करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे निवडून आलेल्या सर्व तरुण सदस्यांचे व्हिजन आहे. गावातील मूलभूत समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देऊन शिक्षण, आरोग्य सेवा सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे बहुतांश तरुणांचे म्हणणे आहे.
चौकट
फुलंब्री तालुक्यातील निवडणुका झालेल्या ग्रामपंचायती : ४९
निवडून आलेले उमेदवार : ४३२
तरुण सदस्यांची संख्या : १६५
कोट
येणारा काळ हा तरुणांचा आहे. तरुणांत काम करण्याची क्षमता आहे. त्यांनी राजकारणात यायला पाहिजे. याचा विचार करून ग्रामपंचायत निवडणूक लढवली. मतदारांनी आशीर्वाद दिल्याने निवडून आलो. येणाऱ्या काळात गावाच्या विकासासाठी काम करणार आहे.
- अंबादास सूर्यभान जाधव
म्हसला (कान्होरी)
कोट
ग्रामीण भागातील विकासाचे केंद्र हे ग्रामपंचायत आहे. यात अनेक ग्रामपंचायतींनी सर्वांगीण विकास केला आहे. नव्या दमाच्या तरुणांनी राजकारणात यावे, असे वाटले म्हणून निवडणूक लढविली. मतदारांनी विश्वास ठेवला असून येत्या पाच वर्षांत गावातील अंतर्गत विकास कसा करता येईल, यावर काम करणार आहे.
- कृष्णा कैलाश वखरे
पिंपळगाव गांगदेव
कोट
गावाच्या राजकारणात महिलांचा सहभाग आवश्यक असून पुरुषांप्रमाणे महिलाही गावाचा सर्वांगीण विकास करू शकतात, हे ध्येय समोर ठेवून प्रथमच निवडणूक लढविली व निवडूनही आले आहे. गावाच्या विकासासाठी येथून पुढे काम करणार आहे.
- अनिता संदीप पेहरकर, गणोरी
फोटो कॅप्शन १) अंबादास जाधव यांचा फोटो २) कृष्णा वखरे यांचा फोटो ३) अनिता पेहरकर यांचा फोटो