नियोजनाचा विषय : कोरोना काळात ७० ग्रामपंचायतींनी दिले रोजगार हमी योजनेत हाताला काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:05 AM2021-06-10T04:05:37+5:302021-06-10T04:05:37+5:30
फुलंब्री : तालुक्यात गेल्या वर्षभरातील कोरोना काळात ग्रामपंचायतींच्या मदतीने तीन कोटी रुपयांची रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामे करण्यात आली. ...
फुलंब्री : तालुक्यात गेल्या वर्षभरातील कोरोना काळात ग्रामपंचायतींच्या मदतीने तीन कोटी रुपयांची रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामे करण्यात आली. यातून १५ हजार मजुरांना रोजगार मिळाला आहे.
ग्रामीण भागात गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून लॉकडाऊन करण्यात आले. यामुळे सर्वच उद्योग, व्यवसाय बंद झाले. शहरात विविध कंपन्यांमध्ये कामासाठी गेलेल्या कामगारांना गावी परतावे लागले. याकाळात मात्र ग्रामपंचायतींनी शासनाची रोजगार हमी योजना राबवून विविध कामे उपलब्ध करून देत मजुरांना आर्थिकदृष्ट्या सहकार्य केले आहे.
चौकट
फुलंब्री तालुक्यातील एकूण ७१ ग्रामपंचायती आहेत. यातील ७० ग्रामपंचायतींनी रोजगार हमी योजनेची कामे मंजूर करुन रोजगार उपलब्ध करून दिला आहे. तर वाणेगाव या एकमेव ग्रामपंचायतने काम उपलब्ध केले नाही.
चौकट
तालुक्यातील तहसील कार्यालयात एकूण नोंदणीकृत मजुरांची संख्या ९० हजारपर्यंत असली तरी यातील फारसे मजूर कामावर येत नाहीत. यातील १५ हजार मजुरांना कामे उपलब्ध झालेली असून त्यांना ३ कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहेत.
कोट
तालुक्यातील कोणत्याही ग्रामपंचायतकडून कामाची मागणी आली तर, तेथे काम उपलब्ध करून दिले जाते. कोरोना काळात मागणी प्रमाणे कामे उपलब्ध करून देण्यात आली. याचा फायदा मजुरांना झालेला आहे.
-विलास गंगावणे, गटविकास अधिकारी
कोट
गेल्या वर्षभराच्या काळात सहा नवीन विहिरी रोजगार हमी योजनेतून मंजूर करुन ती कामे पूर्ण करण्यात आली. यात ९० मजुरांना काम उपलब्ध झालेले आहे.
सदाशिव विटेकर, सरपंच, मुर्शीदाबादवाडी.
कोट
आमच्या गावात रेशीम शेतीमध्ये ४२ कामे करण्यात आली. तर दोन विहिरींची कामे सुरु आहेत. यातून १६० ते १८० मजुरांना कामे उपलब्ध झालेली आहेत. कोरोना काळात यामुळे मजुरांना आधार मिळाला आहे.
अंबादास गायके, सरपंच, पिंपळगाव गंगादेव.
कोट
मी रेशीम शेती करीत आहे. यामध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत मला व माझ्या कुटुंबाला शेतीसोबतच मजुरीही मिळाली आहे. यातून कुटुंबाला आर्थिक हातभार लागला.
- अंकुश लक्ष्मण वाघ, मजूर, पिंपळगाव गांगदेव
कोट
मला ७० आर शेती आहे. अहिल्यादेवी होळकर वैयक्तिक योजनेतून मला सिंचन विहीर मंजूर झाली. या कामावर मला रोजगार हमी योजनेत कामही मिळालेले आहे.
कचरु रामराव निकम, मजूर, मुर्शीदाबादवाडी
चौकट
रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात आलेली कामे
रोजगार हमी योजनेंतर्गत गेल्या वर्षभरामध्ये घरकूल, वैयक्तिक सिंचन विहीर, सार्वजनिक विहीर, विहीर पुनर्भरण, शोष खड्डे, पाझर तलावातील गाळ काढणे, बिहार पॅटर्न अंतर्गत वृक्ष लागवड व संगोपन आदींचा समावेश आहे.