'विषय बुद्धलेणी बचावाचा, मोर्चा निघाला लाखांचा'; छत्रपती संभाजीनगरात बौद्ध अनुयायी एकवटले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 05:55 PM2024-10-07T17:55:38+5:302024-10-07T17:59:57+5:30

राज्यातील सर्वच बौद्धलेण्यांचे संवर्धन करून लेण्यात पायाभूत सुविधा निर्माण करून संरक्षण देण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी बौद्धलेणी बचाव कृती समितीचा छत्रपती संभाजीनगरात मोर्चा.

'Subject to Buddha cave rescue, march of lakhs'; Buddhist followers gathered in Chhatrapati Sambhajinagar | 'विषय बुद्धलेणी बचावाचा, मोर्चा निघाला लाखांचा'; छत्रपती संभाजीनगरात बौद्ध अनुयायी एकवटले

'विषय बुद्धलेणी बचावाचा, मोर्चा निघाला लाखांचा'; छत्रपती संभाजीनगरात बौद्ध अनुयायी एकवटले

छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यातील बौद्धांचे श्रद्धास्थळ म्हणून शहरातील बुद्धलेणीच्या पायथ्याशी असलेल्या विहार, मेडिटेशन सेंटरला गेल्या ६०-७० वर्षांपासून दरवर्षी ५ ते १० लाख उपासक, उपासिका, तसेच अभ्यासक, पर्यटक भेट देतात. मात्र, या श्रद्धास्थळाला अतिक्रमण समजून नोटीस बजावण्यात आल्याने बौद्ध समाजात संतापाची लाट उसळली. जाणीवपूर्वक समाजाच्या भावना दुखावण्याचे षडयंत्र रचले जात असल्याच्या भावना व्यक्त करत याच्या निषेधार्थ आज, क्रांती चौक ते विभागीय आयुक्तालय असा भव्य मोर्चा काढण्यात आला. अत्यंत शिस्तीत आणि शांततेत शहर, जिल्ह्यासह मराठवाड्यातून आलेली लाखो अनुयायी निळ्या आणि पंचशील ध्वजासह मोर्चात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.

क्रांतीचौकापासून सकाळी साडेअकरा वाजता मोर्चा विभागीय आयुक्तालयाकडे निघाला. पक्ष, संघटना  बाजूला सारून बौद्ध अनुयायी मोर्चात एकवटले. नोटीस दिल्याचा निषेध, सरकार विरोधी गगनभेदी घोषणाबाजीने परिसरात दणाणून गेला. मोर्चात उत्स्फूर्त तरूणाई, महिलांची संख्या मोठी होती. मोर्चाचे पहिले टोक गुलमंडी पार तर शेवटचे क्रांतीचौकात असताना अनेक अनुयायी सामील होते. क्रांती चौक परिसर, पैठणगेट रोड खचाखच भरलेला असताना अत्यंत शांततेत आणि शिस्तीत मोर्चा विभागीय आयुक्तालयाकडे रवाना झाला.

प्रशासनाने दिले आश्वासन
विभागीय आयुक्तालयाजवळील अन्नाभाऊ साठे चौकात मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. येथे मंचावर येऊन प्रशासनाकडून पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांनी निवेदन स्वीकारले. पोलिस आयुक्त, महापालिका प्रशासक यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना मागण्यांबाबत कळविण्यात येऊन प्रशासन सकारात्मक आहे, लेणीला धक्का लागणार नाही, असे आश्वासन उपायुक्त बगाटे यांनी मंचावरून देताच अनुयायांनी एकच जल्लोष केला. 

अशा आहेत मागण्या: 
राज्यातील सर्वच बौद्धलेण्यांचे संवर्धन करून लेण्यात पायाभूत सुविधा निर्माण करून संरक्षण देण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी बौद्धलेणी बचाव मोर्चाच्या माध्यमातून यावेळी खालील मागण्या करण्यात आल्या.  
१) बौद्धलेणीच्या पायथ्याशी (छ. संभाजीनगर) पायाभुत सुविधा निर्माण करण्यासाठी ५० एकर जागा देण्यात यावी.
२) बौद्ध लेणी व परिसराचा समावेश बुद्धिस्ट सर्किट मध्ये करण्यात यावा.
३) बौद्ध लेणी व परिसराचा पर्यटन स्थळ व तिर्थक्षेत्राच्या यादीत समावेश करण्यात यावा.
४) बौद्ध लेणीत पायाभूत सुविधा उभारून अजिंठा लेणी च्या धर्तीवर प्रकाशयोजना करून लेणीच्या डोंगराच्या संवर्धनासाठी विशेष निधीची तरतूद करावी.
५) ऐतिहासिक अजिंठा लेणी मार्गावरील हर्सूल टी पॉईंट येथे भव्य बुद्ध मूर्तीची स्थापना करण्यात यावी.
६) अजिंठा लेणी मार्गाचे रखडलेले काम युद्धपातळीवर हाती घेण्यात यावे.
७) महाराष्ट्रातील सर्व बौद्धलेण्यावरील इतर धर्मियांचे अतिक्रमण तात्काळ हटविण्यात येऊन पायाभूत सुविधा देण्यात याव्या सर्व बौद्ध लेण्यांचा बुद्धिस्ट सर्किट व तीर्थक्षेत्र- पर्यटन स्थळात समावेश करावा.
८) प्राचीन बौद्ध वारसा स्थळांची सत्य माहिती देण्यासाठी संरक्षित लेणी वर पुरातत्व खात्यामार्फत प्रशिक्षित गाईड / अभ्यासक नेमण्यात यावेत व मराठी,इंग्रजी, हिंदी भाषेतील सविस्तर माहिती असलेले फलक लावण्यात यावे.
९) महाराष्ट्रातील सर्व बुद्ध लेण्यावर बौद्ध धर्मियांना बौद्धविधी करण्यास परवानगी देण्यात यावी.
१०) घटत्कोच बुद्ध लेणी जंजाळा (सोयगाव) येथे असलेल्या बुद्ध लेणीस जाण्यासाठी रस्ता नसल्याने अभ्यासक पर्यटक तसचे बौद्ध बांधवाची गैरसोय होत आहे आणी सद्यस्थितीत लेणी वर जाणे जिवावर बेतु शकते या साठी तेथे तत्काळ स्वतंत्र रस्ता तयार करण्यात यावा व या बुद्ध लेणीचे योग्य संवर्धन करण्यात यावे.
११) पावसाचे पाणी झिरपून लेण्यांची हानी होत असल्याने संवर्धन व सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात याव्या.
१२) बौद्धलेणी च्या डोंगरावर कुठल्याही प्रकारचे खोदकाम होऊ नये साठी पुरातत्व खात्यास निर्देश द्यावे.
१३) बौद्धलेणी मध्ये सायं. 7 नंतर प्रवेश नसावा.
१४) बौद्धलेणीच्या डोंगराची पावसात पडझड होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्या.
१५) बौद्धलेणीच्या पायथ्याशी होणारी मुरूमचोरी, खोदकाम थांबविण्यात यावे
१६) बौद्ध लेणी डोंगरावरील खाजगी व वर्ग-2 च्या जमिनी ताब्यात घेऊन बौद्ध लेण्यांना अपाय करणाऱ्या कृत्यांना पायबंद घालावा.
१७) बौद्ध लेणी डोंगरावर कूपनलिका (बोअर) खोदणे, जेसीबी व यंत्र वापरून होणारे खोदकाम थांबवून लेणी लगतच्या मार्गावरून अवजड वाहतुकीस प्रतिबंध करण्यात यावा.

Web Title: 'Subject to Buddha cave rescue, march of lakhs'; Buddhist followers gathered in Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.