'विषय बुद्धलेणी बचावाचा, मोर्चा निघाला लाखांचा'; छत्रपती संभाजीनगरात रेकॉर्ड ब्रेक महामोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 01:10 PM2024-10-08T13:10:01+5:302024-10-08T13:10:27+5:30
लाखोंच्या संख्येने निघाला शांततेत मोर्चा, प्रचंड घोषणाबाजीने शहर दणाणले
छत्रपती संभाजीनगर : अखिल भारतीय भिक्खू संघाच्या नेतृत्वाखाली सोमवारी निघालेला ‘बुद्धभूमी बचाव’ मोर्चाने आजपर्यंतच्या सर्व मोर्चाचे ‘रेकॉर्ड ब्रेक’ केले. सुमारे दीड लाखांपेक्षा जास्त बौद्ध अनुयायांच्या या मोर्चाने शहर दणाणले. जनसमुदायाने अखेरपर्यंत शांतता आणि संयम राखल्यामुळे पोलिस प्रशासनासह सर्वांनीच नि:श्वास सोडला.
बुद्धलेणीच्या पायथ्याशी असलेल्या बुद्धभूमीतील विपश्यना विहार, भिक्खुंच्या कुटी व अन्य परिसर हा विद्यापीठाच्या जागेबाहेर गायरान जमिनीवर आहे. तरीही या परिसराला अतिक्रमण समजून ते काढण्याबाबत प्रशासनाने नोटीस बजावली होती. त्यामुळे बौद्ध अनुयायी संतप्त झाले आणि भिक्खू संघाच्या नेतृत्वाखाली महामोर्चा काढला. भदन्त विशुद्धानंदबोधी महास्थवीर व अखिल भारतीय भिक्खु संघाच्या नेतृत्वाखाली सोमवारी दुपारी १२:३० वाजता क्रांतीचौकातून मोर्चाला सुरुवात झाली. तत्पूर्वी, सकाळी साडेदहा वाजेपासूनच महिला, पुरुष, आबालवृद्धांचे जत्थे क्रांतीचौकाकडे कूच करत होते. क्रांतीचौक ते पैठण गेट दुतर्फा रस्ता नागरिकांनी तुडुंब भरल्यानंतर मोर्चा सुरू झाला. एका रथात तथागत गौतम बुद्धांची मूर्ती, सोबत भिक्खू संघ ‘बुद्धं.. सरणं.. गच्छामी’चा घोष करत होते. हातात पंचशील व निळे ध्वज घेऊन जनसमुदाय मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चाचे पहिले टोक सुभेदारी विश्रामगृहाजवळ, तर शेवटचे टोक क्रांतीचौकात होते. शहर व परिसरातून चौकाचौकांतून नागरिकांचे जत्थे घोषणा देत मोर्चात सहभागी होत होते. मोर्चात जनसमुदायाच्या चेहऱ्यावर बुद्धभूमीविषयी असलेली श्रद्धा ठळकपणे जाणवत होती. प्रत्येक जण जिवाच्या आकांताने बुद्धभूमी बचाओची घोषणा देत चालत होता.
दिल्लीगेटसमोर भव्य विचारमंचावर भदन्त विशुद्धानंदबोधी यांनी त्रिशरण, पंचशील पठण केल्यानंतर एवढा मोठा मोर्चा, पण अतिशय शांततेत निघाला. मोर्चाला कुठलेही गालबोट लागणार नाही, याची सर्वांनी दक्षता घेतल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर, रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी मोबाइलवरून शुभेच्छा दिल्याचे लाइव्ह प्रसारण करण्यात आले.
बुद्धभूमी नियमित करण्याचे आश्वासन
विचारमंचावर पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांनी विभागीय आयुक्तांच्या वतीने जाऊन भिक्खू संघाचे निवेदन स्वीकारले. त्यावेळी बगाटे यांनी लवकरच बुद्धभूमीसह आजूबाजूचा परिसर नियमित केला जाईल. यासंदर्भात पोलिस आयुक्त प्रवीण पवार, महापालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत यांनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून हा परिसर नियमित करण्याविषयी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी होकार दिला असून अन्य मागण्यांबाबत देखील शासन सकारात्मक विचार करत आहे, असे आश्वासन दिले. दरम्यान, रिपाइंचे बाबूराव कदम यांच्यासह अन्य नेत्यांनी मात्र पोलिस प्रशासनाने निवेदन स्वीकारल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. हा महसूल विभागाशी निगडित प्रश्न असल्यामुळे विभागीय आयुक्तांनी या मोर्चासमोर येणे गरजेचे होते, अशी भावना त्यांनी बोलून दाखविली.
मोर्चेकऱ्यांच्या काय होत्या मागण्या
‘बुद्धभूमी बचाव’ या मुख्य मागणीसाठी निघालेल्या या मोर्चाने प्रशासनाकडे अनेक मागण्यांचे निवेदन दिले. यामध्ये बुद्धलेणीच्या पायथ्याशी पायाभूत सुविधा निर्माण करून शासनाने या श्रद्धास्थळासाठी ५० एकर जागा द्यावी. या परिसराचा समावेश बुद्धिस्ट सर्किटमध्ये करावा. बुद्ध लेणी व परिसराचा पर्यटनस्थळ व तीर्थक्षेत्रामध्ये समावेश करावा. अजिंठा लेणी मार्गावरील हर्सूल टी पॉइंट येथे बुद्धांची भव्य मूर्तीची उभारण्यात यावी. महाराष्ट्रातील सर्व बुद्धलेण्यांवरील इतर धर्मीयांचे अतिक्रमण तात्काळ हटविण्यात येऊन तिथेही पायाभूत सुविधा देण्यात याव्यात, चिकलठाणा विमानतळाचे नामांतर ‘अजिंठा विमानतळ, छत्रपती संभाजीनगर’, असे करण्यात यावे, पावसाचे पाणी झिरपून लेण्यांची हानी होत असल्यामुळे लेण्यांच्या संवर्धन व सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात. बुद्धलेणीच्या डोंगरावर कोणत्याही प्रकारचे खोदकाम न होण्यासाठी पुरातत्त्व खात्यास निर्देश द्यावेत, आदी मागण्यांचा समावेश आहे.
‘हमसे जो टकरायेगा.....’
बुद्धभूमीला अतिक्रमण समजून ती पाडण्याची भाषा करणाऱ्यांना उत्तर म्हणून मोर्चात विविध गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. यामध्ये ‘हमसे जो टकरायेगा, मिट्टी मे मिल जाएगा’, ‘बोल दलिता हल्लाबोल, अरे पुस्तक लेके हल्लाबोल’, ‘तख्त बदल दो, ताज बदल दो, बेईमानों का राज बदल दो’, आदींचा समावेश होता. विशेष म्हणजे, या मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती.
बौद्ध अनुयायी एकवटले
भिक्खू संघाच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चात बुद्धभूमीचे संवर्धन व संरक्षणासाठी बौद्ध अनुयायी एकवटले. यानिमित्ताने आंबेडकरी पक्ष- संघटनांनीदेखील एकजूट दाखवली. ‘एमआयएम’चे प्रदेशाध्यक्ष माजी खा. इम्तियाज जलील, वंचित बहुजन आघाडीचे अफसर खान यांच्यासह मुस्लिम कार्यकर्त्यांचा सहभागही लक्षवेधी ठरला. विशेष म्हणजेे, विद्यापीठ, शाळा-महाविद्यालयांना प्रशासनाने सुटी जाहीर केल्यामुळे मोर्चात विद्यार्थी, शिक्षकांची मोठी संख्या होती. या मोर्चात मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांसह पुणे, मुंबई येथून आलेले कार्यकर्तेदेखील सहभागी झाले होते.
पाणी, अल्पोपाहाराचे वाटप
भर उन्हात निघालेल्या या मोर्चातील जनसमुदायासाठी अनेक पक्ष-संघटनांनी रस्त्यात ठिकठिकाणी पाणी आणि अल्पोपाहाराची व्यवस्था केली होती. यामध्ये रिपाइंचे जिल्हाध्यक्ष विजय मगरे, माधवराव बोर्डे प्रतिष्ठानचे धनंजय बोर्डे, अ. भा. गुरू रविदास परिवर्तन सेना, आयटीआय मागासवर्गीय कर्मचारी संघटना, नागसेन मित्रमंडळ, भीमशक्ती, पदमपुरा मित्रमंडळ, आदींनी पाण्याच्या बाटल्या, अल्पोपाहार, भोजनदान केले.
मोजक्याच नेत्यांची भाषणे
मोर्चात सर्वच पक्ष-संघटनांचे नेते कार्यकर्त्यांसह दाखल झाले होते. पण, मोर्चाचे आयोजन भिक्खू संघाच्या नेतृत्वाखाली केल्यामुळे सुरुवातीलाच अनेक नेत्यांना विचारमंचावरून उतरविण्यात आले. केवळ भदन्त विशुद्धानंदबोधी हेच मार्गदर्शन करतील, असे ठरले होते. तरीही दोन-तीन नेत्यांनी भाषणे केलीच. पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांनी प्रशासनाच्या वतीने मंचावर भूमिका मांडून लेणीला धक्का लागणार नाही, अशी शाश्वती देताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला.
भिक्खुंचीही उपस्थिती लक्षवेधी
मोर्चात भदन्त डॉ. उपगुप्त महाथेरो, भदन्त बोधिपालो महाथेरो, डॉ. भदन्त एम. सत्यपाल महाथेरो, भदन्त नागसेनबोधी महाथेरो, भदन्त आर. आनंद, भन्ते कश्यप, भन्ते संघप्रिय, भन्ते बोधी धम्मो, भन्ते शिलबोधी आदींसह शेकडो भिक्खू मोर्चात सहभागी होते. यांच्यासह प्रकाश निकाळजे, बाबूराव कदम, डॉ. ऋषिकेश कांबळे, दिनकर ओंकार, पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार, दलित कोब्राचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई विवेक चव्हाण, अशोक बोर्डे, रिपाइंचे (खरात) राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात, मिलिंद दाभाडे, गौतम खरात, गौतम लांडगे, रमेशभाई खंडागळेे, कृष्णा बनकर, संतोष भिंगारे, प्रा. सुनील मगरे, अरुण बोर्डे, किशोर थोरात, विजय मगरे, भीमराव हत्तिअंबीरे, मिलिंद शेळके, मनीष नरवडे, सचिन निकम, गुणरत्न सोनवणे, रमेश गायकवाड, राजू शिंदे, बाळू गायकवाड, बंडू कांबळे, सतीश गायकवाड, राजू आमराव, विनोद बनकर, संदीप शिरसाट, श्रावण गायकवाड, विजय वाहुळ, बबन नरवडे, राजू साबळे, कृष्णा भंडारे, आदींसह सर्वच पक्ष-संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.