कुलसचिवांच्या मूळ नियुक्तीसंदर्भात सहसंचालकांकडे अहवाल सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 07:33 PM2020-08-28T19:33:46+5:302020-08-28T19:38:51+5:30
रिपाइने कुलगुरूंना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्र-कुलगुरूंनी सहसंचालकांना सादर केलेल्या अहवालातही डॉ. सूर्यवंशी यांच्या मूळ नियुक्तीत विद्यापीठ नियमांना डावलल्याचे मान्य केले आहे.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांच्या मूळ नियुक्तीबद्दल रिपाइं (ए) च्या तक्रारीच्या अनुषंगाने चार पानी अहवाल कागदपत्रांसह उच्च व तंत्रशिक्षण सहसंचालकांना प्र-कुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते यांनी सादर केला. यासंदर्भात डॉ. वक्ते म्हणाले की, प्रशासनाकडे असलेली कागदपत्रे, पुराव्यानिशी वस्तुनिष्ठ स्वयंस्पष्ट अहवाल सहसंचालकांना सादर केला आहे. त्यांनी त्याविषयी भूमिका स्पष्ट करून निर्णय घेणे अपेक्षित आहे.
रिपाइने कुलगुरूंना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्र-कुलगुरूंनी सहसंचालकांना सादर केलेल्या अहवालातही डॉ. सूर्यवंशी यांच्या मूळ नियुक्तीत विद्यापीठ नियमांना डावलल्याचे मान्य केले आहे. मूळ नियुक्ती (अधिव्याख्याता) एकदाही विद्यापीठ नियमांनुसार झालेली नाही. महाविद्यालयाने विद्यापीठ प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संगनमत करून घेतलेल्या मान्यतांना डॉ. सूर्यवंशी आता वाचवू पाहत आहेत. त्यांना दिलेल्या सर्व मान्यता बोगस असल्याकारणाने त्या रद्द करून संस्थेवर व महाविद्यालय प्राचार्यांवर गुन्हा नोंद करावा. शिवाय प्र-कुलगुरूंनी दिलेला स्वयंस्पष्ट अहवालात त्रुटी आहेत. कोणत्या प्रवर्गातून त्यांची नियुक्ती केली, हे स्पष्ट होत नाही. त्याचा खुलासाही नव्या स्वयंस्पष्ट अहवालात करून तो सहसंचालकांना देण्यात यावा, अशी मागणी रिपाइंचे मराठवाडा अध्यक्ष नागराज गायकवाड यांनी निवेदनात केली आहे.
उच्च व तंत्र शिक्षण सहसंचालक डिगांबर गायकवाड यांदसर्भात म्हणाले की, कुलसचिव म्हणून नियुक्ती ही विद्यापीठाच्या आस्थापनेवर आहे. या प्रकरणी स्वयंस्पष्ट अहवाल मागवला होता. तो प्राप्त झाला असून, संचालकांना स्पीड पोस्टने पाठवला आहे. यासंबंधी कार्यवाही संचालकच करतील. डॉ. सूर्यवंशी यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की, निवड समितीने माझी सर्व कागदपत्रे तपासून नियुक्ती केली. छाननी समितीने कागदपत्रे तपासणी केल्यावर मला कॉल मिळाला. त्यानंतर मुलाखतीत पात्रता पाहूनच माझी निवड झाली आहे. हे सर्व पारदर्शक आहे. तक्रारदारांनी कुलगुरूंनाही निवेदन दिले. त्यासंबंधी प्रशासनाने संबंधितांना उत्तर दिले असून, पुढील कार्यवाही प्रशासन करेल.
कृती समितीचे निवेदन
मार्च महिन्यात विद्यापीठात केलेल्या संवैधानिक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. कुलसचिव डॉ. सूर्यवंशी या पदाला पात्र ठरत नाहीत. त्यांना पदावरून हटवा व त्रुटी दूर करून सहसंचालकांना पुन्हा नव्याने स्वयंस्पष्ट अहवाल पाठवा, अशी मागणी कृती समितीच्या वतीने डॉ. शंकर अंभोरे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. राजेश करपे, डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. संभाजी वाघमारे, डॉ. उमाकांत राठोड यांनी प्रकुलगुरूंना दिलेल्या निवेदनात केली आहे.