गुन्हेगारांची यादी महिन्यात सादर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 12:24 AM2017-09-24T00:24:29+5:302017-09-24T00:24:29+5:30
जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृती कमी करण्यासाठी गुन्हेगारांची यादी एक महिन्याच्या आत सादर करा, असे निर्देश गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी शनिवारी येथे दिले
दीपक केसरकर : संपूर्ण राज्यात सीसीटीव्ही बसविण्यात येणार
जालना : व्यापारी नितीन कटारिया व गोविंद गगराणी यांच्या हत्येनंतर शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी व शांततेचे वातावरण टिकुन राहण्यासाठी कायदा व सुव्यवस्था आबाधित राहिली पाहिजे. जेणेकरुन गुन्हेगारांचा बिमोड करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने व पोलीस यंत्रणेने कडक कार्यवाही करावी. जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृती कमी करण्यासाठी गुन्हेगारांची यादी एक महिन्याच्या आत सादर करा, असे निर्देश गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी शनिवारी येथे दिले. तसेच राज्यात महत्त्वाच्या ठिकाणी लवकरच सीसीटीव्ही बसविण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात कायदा व सुव्यवस्था आढावा बठकीत ते बोलत होते. बैठकीस पालकमंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, आ. राजेश टोपे, आ. नारायण कुचे, आ. संतोष दानवे, माजी आ. संतोष सांबरे, जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे, पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, भाजपचे भास्कर दानवे, रामेश्वर भांदरगे, उद्योजक किशोर अग्रवाल, सतीश पंच, रमेश तवरावाला, दीपक भुरेवाल, डॉ. सुभाष अजमेरा, अर्जुन गेही, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर, ए.जे. बोराडे आदी उपस्थित होते.
राज्यमंत्री केसरकर म्हणाले की, जालना हे व्यापारी शहर आहे. सध्या शहरात भुरट्या चोºयांचे प्रमाण वाढले असून, महिलांची छेडछाड होणार नाही तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेकरीता विशेष लक्ष देवून पोलीस यंत्रणेने गुन्हेगारी मोडून काढली पाहिजे. विविध समारंभ व उत्सवाच्या वेळेस पोलीस यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण पडतो. त्यासाठी शासन पोलीस अधिकारी कर्मचाºयांकरीता विविध सोयीसुविधा पुरवित असते. त्यांना हक्काची घरे असावी म्हणून शासन दराने घरे उपलब्ध करुन देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यमंत्री खोतकर म्हणाले की, जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणेने गुन्ह्याच्या तांत्रिक बाबीची सखोल पडताळणी करुन कठोर शिक्षा होण्यासाठी गुन्हेगाराला तडीपार करण्याच्या सूचना देवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे. यासाठी पोलिसांनी मनात विश्वास ठेवून बेधडकपणे कारवाई करावी. गुन्हेगारांना पाठीशी न घालता कुठल्याही गुन्हेगारांवर कारवाई होताना लोकप्रतिनीधी आड येणार नाही याची दक्षता घेवून शासन आपल्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कायदा सुव्यवस्थेबाबत आ.राजेश टोपे यांनी ही आपले मत मांडले.
पालकमंत्री लोणीकर म्हणाले की, शहराप्रमाणेच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा नियोजन समिती मार्फत ७० सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. या पुढे संपूर्ण जिल्हाभर मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून खरेदी करुन बसविण्यात येतील.
अवैधरित्या प्लॉटींग व्यवसाय करणारे, वाळु माफिया, मटका चालवणाºया मुळ मालकांवर तसेच अवैध दारु विक्रेत्यांवर कडक कार्यवाही करुन गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीसांनी कडक कारवाई करावी यासाठी गरज भासल्यास गुन्हेगारावर राष्ट्रीय सुरक्षा (मोक्का) लावून गुन्हेगारांना हद्दपार करण्याच्या सूचनाही पालकमंत्री लोणीकर यांनी दिल्या.
या बैठकीस शहरातील व्यापारी, उद्योजक, पदाधिकारी व संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
...
कटारिया कुटूंबियांचे सांत्वन
तत्पूर्वी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यासह राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आ. राजेश टोपे यांनी नितीन कटारीया यांच्या मोदीखाना येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबाची भेट घेवून सांत्वन केले. शासन आपल्या पाठीशी असून आरोपींना कठोर शिक्षा होईल या दृष्टिने प्रयत्न केले जातील, असे राज्यमंत्री केसरकर यांनी सांगितले.
....
पालकमंत्र्यांच्या निर्णयाचे समर्थन
नितीन कटारीया व गोविंद गगराणी हत्या प्रकरणातील तपासात पोलीस प्रशासनाने हलगर्जीपणा केल्याने त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही केल्याबद्दल पालकमंत्री बबनराव लोणीकर यांचे राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी समर्थन केले.