नवीन अभ्यासक्रम सादर करा, अन्यथा मिळणार नोटिसा; कुलगुरूंचा इशारा

By राम शिनगारे | Published: November 3, 2023 07:40 PM2023-11-03T19:40:23+5:302023-11-03T19:40:42+5:30

पुढील वर्षी पदवीस्तरावर होणार ’एनईपी’ची अंमलबजावणी

submit new courses, otherwise receive notices; Vice Chancellor's warning | नवीन अभ्यासक्रम सादर करा, अन्यथा मिळणार नोटिसा; कुलगुरूंचा इशारा

नवीन अभ्यासक्रम सादर करा, अन्यथा मिळणार नोटिसा; कुलगुरूंचा इशारा

छत्रपती संभाजीनगर : आगामी वर्षापासून महाविद्यालयांमध्ये पदवीस्तरावर नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार आहे. आतापासूनच त्याची तयारी सुरू आहे. नव्या धाेरणानुसार अभ्यासक्रम तयार करण्यात येत आहेत. त्यात विद्यापीठाच्या विविध विषयांच्या एकूण अभ्यासमंडळांपैकी तब्बल १९ मंडळांनी अभ्यासक्रम तयार केला नसल्याची माहिती समोर आली आहे. या अभ्यासमंडळांनी येत्या चार दिवसांत अभ्यासक्रम द्यावे, अन्यथा संबंधितांना नोटिसा बजावण्यात येतील, असा इशाराच कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी बैठकीत दिला.

विद्यापीठात अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आणि सदस्यांची बैठक गुरुवारी (दि.२) महात्मा फुले सभागृहात घेण्यात आली. यावेळी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, अधिष्ठाता डॉ. वाल्मिक सरवदे, डॉ. भालचंद्र वायकर, डॉ. प्रशांत अमृतकर आणि डॉ. चेतना सोनकांबळे यांच्यासह अभ्यासमंडळांचे ११० अध्यक्ष व सदस्य ऑनलाईन व प्रत्यक्ष हजर होते. प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ यांनी नवीन शैक्षणिक धाेरणाच्या प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टीने केलेल्या प्रयत्नांची माहिती प्रास्ताविकात दिली. त्याशिवाय प्रत्येक अधिष्ठांतानी संबंधित विद्याशाखांमधील अभ्यासक्रमांची माहिती सादर केली. अध्यक्षीय समारोपात कुलगुरू डॉ. येवले म्हणाले, आगामी वर्षांपासून पदवीस्तरावर नव्या धोरणाची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे सर्वच विषयांचा अभ्यासक्रम नवीन धोरणानुसार असणार आहे. त्यासाठी अभ्यासक्रमांच्या अध्यक्ष व सदस्यांनी लवकरात लवकर अभ्यासक्रम तयार करून प्रशासनाकडे सादर करावा. वेळेत अभ्यासक्रम सादर न करणाऱ्या अभ्यास मंडळाच्या अध्यक्षांसह सदस्यांना नियमानुसार नोटीस बजावण्यात येतील, असा इशाराही कुलगुरूंनी यावेळी दिला.

६६ विषयांचा नवीनच अभ्यासक्रम
चार विद्याशाखेत मिळून एकूण ६६ अभ्यास मंडळे आहेत. यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेत ३३, मानव्यविद्यात १९, आंतरविद्या शाखेत १० अभ्यासमंडळांचा समावेश आहे. त्यातील १९ अभ्यासकमंडळांची नवीन अभ्यासक्रम तयार केला नसल्याची माहिती समाेर आली आहे. डॉ. वाल्मिक सरवदे यांच्या नेतृत्वातील वाणिज्य विद्याशाखेतील चारही अभ्यासमंडळांनी अभ्यासक्रम दाखल केले आहेत. कुलगुरूंनी १९ अभ्यासमंडळांना ६ नोव्हेंबपर्यंतची मुदत दिली आहे.

Web Title: submit new courses, otherwise receive notices; Vice Chancellor's warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.