रुग्णालयामधील रिक्त पदे भरण्याबाबतचा रोड मॅप सादर करा; खंडपीठाचे शासनाला निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 05:19 PM2021-06-17T17:19:12+5:302021-06-17T17:21:30+5:30
खासदार इम्तियाज जलील यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयातील वर्ग १ ते ४ मधील रिक्त पदे त्वरित भरण्याची विनंती जनहित याचिकेद्वारे केली आहे.
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयामधील रिक्त पदे भरण्याबाबत शासनाने काय कार्यवाही केली याची माहिती (रोड मॅप)घेऊन पुढील सुनावणीवेळी सादर करण्याचे तोंडी निर्देश मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या खंडपीठाने बुधवारी राज्याच्या महाधिवक्ता यांना दिले.
खासदार इम्तियाज जलील यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयातील वर्ग १ ते ४ मधील रिक्त पदे त्वरित भरण्याची विनंती जनहित याचिकेद्वारे केली आहे. याचिकेच्या सुनावणीवेळी खंडपीठाने वरील निर्देश दिले. याचिकेवर शुक्रवारी (दि.१८) पुढील सुनावणी होणार आहे .
खा. जलील यांनी निदर्शनास आणून दिले की, घाटीतील सुपर स्पेशालिटी वॉर्डाची सुमारे १५० कोटी रुपये खर्च करून बांधलेली इमारत तयार असून कॅथलॅब व ६ शस्त्रक्रियागार तयार असून तज्ज्ञ डॉक्टरांअभावी या वॉर्डात एकही शस्त्रक्रिया झालेली नाही. विशेष म्हणजे शासनाने मुंबईच्या ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय येथील हृदयशस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. आशिष भिवापूरकर यांची २०१७ ला घाटीत नियुक्ती केली होती. ते एप्रिल २०१८ ला येथे रुजू झाले; मात्र मागील तीन वर्षांत त्यांनी एकही हृदयशस्त्रक्रिया केलेली नाही. परंतु मासिक पगारापोटी दरमहा २ लाख ५३ हजार ५५४ रुपये डॉ. भिवापूरकर यांनी घाटीतून उचललेले आहेत. यासंदर्भात अतिरिक्त शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश खंडपीठाने खा. जलील यांना दिले. तसेच सरकारी वकिलांना याबाबत माहिती घेण्याचे निर्देश दिले.
वर्ग १ व २ ची पदे राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येत असली तरी सद्यस्थितीत रुग्णसंख्या वाढली असताना किमान वर्ग ३ व् ४ ची पदे जी अनेक वर्षांपासून रिक्त आहेत ती तरी पदे त्वरित भरावीत, अशी मागणी खा. जलील यांनी केली. सुनावणीवेळी घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर उपस्थित होत्या. केंद्राकडून असिस्टंट सॉलिसिटर जनरल अजय तल्हार, राज्य शासनातर्फे मुख्य सरकारी वकील डी. आर. काळे व सहायक सरकारी वकील सुजीत कार्लेकर यांनी काम पाहिले.
दीर्घ काळापासून २०४८ रिक्त पदे
खा.जलील यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात दीर्घ काळापासून एकूण २०४८ पदे रिक्त आहेत. त्यापैकी घाटी रुग्णालयात ८६८, घाटी रुग्णालयाच्या सुपर स्पेशालिटी वॉर्डात २१९, महापालिकेच्या रुग्णालयात ८३, जिल्हा परिषदेच्या रुग्णालयात ३३०, शासकीय कर्क रुग्णालयात १२२, शासकीय कर्क रुग्णालयाच्या एक्स्टेंशन बिल्डिंगमध्ये ३६४, चिकलठाणा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ६० पदे रिक्त आहेत.