प्रभागरचनेचा आराखडा सादर करा; राज्य निवडणूक आयोगाचे महापालिकांना पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2021 02:02 PM2021-11-09T14:02:43+5:302021-11-09T14:05:47+5:30
दिवाळीच्या सुट्ट्यांपूर्वी म्हणजे ३ नोव्हेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाने २१ महापालिकांना प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा सादर करण्याचे आदेश दिले.
- मुजीब देवणीकर
औरंगाबाद : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महापालिकांमधील नगरसेवकांची संख्या वाढविण्याचा निर्णय अलीकडेच घेतला. त्यामुळे राज्यातील सर्व महापालिकांनी प्रभागरचनेचे काम तूर्त थांबविले होते. निवडणूक आयोगाने दिवाळी सुट्ट्यांपूर्वी सर्व महापालिकांना प्रारूप आराखडे सादर करण्यास तारीख निश्चित करून दिली. त्यामुळे सर्व महापालिकांमध्ये पुन्हा एकदा प्रभागरचनेचे काम सुरू झाले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने ५ ऑक्टोबर रोजी राज्यातील २१ महापालिकांना प्रभागरचनेनुसार आराखडे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकांनी समिती स्थापन करून कामालाही सुरुवात केली होती. अत्यंत गोपनीय पद्धतीने करण्यात येणाऱ्या या कामात काही महापालिकांमध्ये राजकीय मंडळींनी सोयीनुसार हस्तक्षेपही केले होते. त्यानंतर राज्य शासनाने सर्व महापालिकांमधील सदस्यसंख्या वाढविण्याचा निर्णय घेतला. सदस्य संख्या वाढली म्हणजे प्रभाग वाढले. नवीन पद्धतीने सर्व प्रभाग तयार करावे लागतील. त्यासाठी सुधारित लोकसंख्या कशी गृहीत धरावी, असा प्रश्न महापालिकांना पडला.
निवडणूक आयोगाचे नवीन आदेश आल्यानंतरच काम सुरू करण्याचा निर्णय बहुतांश महापालिकांनी घेतला. दिवाळीच्या सुट्ट्यांपूर्वी म्हणजे ३ नोव्हेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाने २१ महापालिकांना प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा सादर करण्याचे आदेश दिले. दिवाळी साजरी करून अधिकारी सोमवारी महापालिकेत आल्यानंतर हाती आयोगाचे आदेश पडले. राज्यातील पाच महापालिकांना, तर १८ नोव्हेंबरपर्यंत आराखडा सादर करण्याचे आदेश देण्यात आहेत. त्यामुळे महापालिकांमध्ये पुढील दहा दिवस लगबग अधिक असेल. त्यातच महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना आपला प्रभाग कसा राहील, याची उत्सुकता आहे.
आराखडा कधी सादर करावा लागणार?
१८ नोव्हेंबरपर्यंत- नवी मुंबई, औरंगाबाद, वसई-विरार, कल्याण -डोंबिवली, कोल्हापूर.
३० नोव्हेंबरपर्यंत- ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला, नागपूर.
२५ डिसेंबरपर्यंत- लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी-निजामपूर, मालेगाव.
१५ फेब्रुवारीपर्यंत- पनवेल, मीरा-भाईंदर, नांदेड-वाघाळा.