‘पंतप्रधान आवास’साठी बजेटमध्ये भरीव तरतूद;छत्रपती संभाजीनगरात ११ हजार घरे पहिल्याटप्प्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 07:19 PM2024-07-24T19:19:40+5:302024-07-24T19:19:53+5:30

केंद्र, राज्य शासनाकडून मिळणार २७५ कोटींचे अनुदान

Substantial provision in the budget for 'Pantant Pradhan Awas'; 11 thousand houses in Chhatrapati Sambhaji Nagar in the first phase | ‘पंतप्रधान आवास’साठी बजेटमध्ये भरीव तरतूद;छत्रपती संभाजीनगरात ११ हजार घरे पहिल्याटप्प्यात

‘पंतप्रधान आवास’साठी बजेटमध्ये भरीव तरतूद;छत्रपती संभाजीनगरात ११ हजार घरे पहिल्याटप्प्यात

छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान आवास योजनेला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन केंद्र शासनाने मंगळवारी अर्थसंकल्पात पुढील पाच वर्षांसाठी २.२ लाख कोटी रुपये अनुदान देण्याची घाेषणा केली. छत्रपती संभाजीनगर शहराला ४० हजार घरे बांधण्यास यापूर्वीच मंजुरी मिळालेली आहे. पहिल्या टप्प्यात ११ हजार घरे बांधण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी कंत्राटदारांच्या निविदा सुद्धा अंतिम केल्या आहेत. कंत्राटदारांनी बांधकाम परवानगी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, परवानगी मिळताच योजनेचा नारळ फोडण्यात येईल.

पंतप्रधान आवास योजनेची घोषणा २५ जून २०१५ मध्ये करण्यात आली. या योनजेत ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर शहराचाही समावेश करण्यात आला. मात्र, योजनेसाठी जागाच नाही, म्हणून मनपाने काहीच केले नाही. तत्कालीन खा. इम्तियाज जलील यांनी लोकसभेत २०२१ मध्ये हा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे घाई घाईत महसूल विभागाने मनपाला तिसगाव, हर्सूल, पडेगाव, सुंदरवाडी इ. ठिकाणी जागा दिल्या. तातडीने ४० हजार घरांचा डीपीआर केंद्राला सादर केला. ३१ मार्च २०२२ रोजी योजनेचा कालावधी संपत होता. ३० मार्च रोजी मनपाला मंजुरी मिळाली. त्यानंतर नव्याने निविदा प्रक्रिया राबवून कंत्राटदार निश्चित करण्यात आले. नंतर केंद्र शासनाने डिसेंबर २०२४ पर्यंत योजनेला मुदतवाढ दिली.

पंतप्रधान आवास योजनेच्या १.० मध्ये मनपाला आतापर्यंत एकही घर बांधता आले नाही. २.० योजनेची घोषणा झाली तरी जुन्या योजनेच्या कामाचा नारळही फोडता आला नाही. पुढील काही महिन्यांत ११ हजार १२० घरांचे काम सुरू होईल. प्रत्येक लाभार्थ्याला अडीच लाखांहून अधिक रक्कम मिळेल. त्यानुसार २७५ कोटींहून अधिक रक्कम केंद्र, राज्याकडून मिळेल.

कुठे किती घरे बांधणार?
सुंदरवाडी- ३, २८८
तिसगाव- १,९७६
तिसगाव-४,६८०
पडेगाव- ६७२
हर्सूल-५०४

Web Title: Substantial provision in the budget for 'Pantant Pradhan Awas'; 11 thousand houses in Chhatrapati Sambhaji Nagar in the first phase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.