मराठी शाळा अन् प्रादेशिक भाषेतून त्यांनी खेचले यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 12:38 AM2018-05-03T00:38:15+5:302018-05-03T00:40:23+5:30
सर्वसाधारण कौटुंबिक परिस्थिती, जिल्हा परिषदेसह सर्वसामान्य मराठी माध्यमांच्या शाळेतून शिक्षण घेतलेल्या मराठवाड्यातील तरुण-तरुणींनी यंदा केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षेत डंका वाजविला. या यशवंतांचा सत्कार ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते बुधवारी ‘लोकमत भवना’त करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सर्वसाधारण कौटुंबिक परिस्थिती, जिल्हा परिषदेसह सर्वसामान्य मराठी माध्यमांच्या शाळेतून शिक्षण घेतलेल्या मराठवाड्यातील तरुण-तरुणींनी यंदा केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षेत डंका वाजविला. या यशवंतांचा सत्कार ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते बुधवारी ‘लोकमत भवना’त करण्यात आला.
प्रणय नहार (१९९), मोहंमद नूह सिद्दीकी (३२६), सलमान पटेल (३३९), भावेश अनिलकुमार शर्मा (५०४) आणि डॉ. मोनिका घुगे (७६५) यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी सत्कार केला. त्यांनी हे यश प्राप्त करण्यासाठी घेतलेले श्रम, त्यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी, शाळा, महाविद्यालयीन शिक्षण याविषयी नजाकतीने संवाद साधत राजेंद्र दर्डा यांनी त्यांचे मनोगत जाणून घेतले.
स्पर्धा परीक्षा देताना कुणीही इंग्रजी भाषेचा फोबिया बाळगता कामा नये, असे एका सुरात या गुणवंतांनी येथे सांगितले. यावेळी सलमान पटेल म्हणाले की, ते फुलंब्रीच्या जिल्हा परिषद शाळेतून सातवीपर्यंत उर्दू माध्यमातून शिकले. पुढे कन्नड तालुक्यातील कुंजखेडा येथील शाळेतून दहावी उत्तीर्ण झाले. त्यानंतर ११ वी ते एम.एस्सी. त्यांनी औरंगाबादच्या मौलाना आझाद महाविद्यालयातून पूर्ण केले. डॉ. मोनिका या दहावीपर्यंत शारदा मंदिर प्रशालेत होत्या. नंतर स.भु. महाविद्यालय आणि औरंगाबादेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयातून त्यांनी एम.बी.बी.एस. पूर्ण केले. भावेश शर्मा यांचे केजी टू पीजीपर्यंतचे शिक्षण औरंगाबादेत झाले.
हे सर्वच गुणवंत एका सर्वसामान्य कुटुंबांतून आलेले आहेत. सलमान पटेल व मोहंमद नूह यांनी पहिल्याच प्रयत्नात हे यश संपादन केले. भावेश यांनी २०१४ पासून या परीक्षेची तयारी सुरू केली होती. डॉ. मोनिका घुगे यांची मुलाखत देण्याची ही चौथी वेळ होती. सतत तीन वेळेस त्या १० ते १२ गुणांनी मागे पडत होत्या, असे सांगत त्या म्हणाल्या, जिद्द कायम ठेवावीच लागते. ही परीक्षा क्रॅक करण्यासाठी संयम हवाच असतो. सलमान पटेल व मोहंमद नूह यांनी या परीक्षेसाठी उर्दू साहित्य, तर भावेश यांनी इतिहास हा वैकल्पिक विषय निवडला होता, हे विशेष.
मुस्लिम समाजातील मुलांना नागरी सेवा परीक्षेकडे आकर्षित करण्यासाठी शहरात काविश फाऊंडेशन स्थापन करून मार्गदर्शन करणारे शोयब सिद्दीकी यांच्या शिकवणीतूनच सलमान व मोहंमद नूह घडले. ते नूहचे वडील आहेत. राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते यावेळी शोयब सिद्दीकी यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. या कौटुंबिक सत्कार सोहळ्यास डॉ. घुगे यांचे वडील श्रीधर घुगे, आई शारदा घुगे आणि वहिनी आरती घुगे, सलमान पटेल यांचे मोठे बंधू सईद पटेल यांची उपस्थिती होती.
या चर्चेदरम्यान अनेक बाबी प्रथमच समोर आल्या. वंजारी समाजातून आयएएस परीक्षा उत्तीर्ण होणारी मी पहिलीच मुलगी असल्याचे डॉ. मोनिका घुगे यांनी स्पष्ट केले. तर औरंगाबादेतून मुस्लिम समाजातून नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होणारे मोहंमद नूह पहिलेच असल्याचे त्यांचे वडील शोयब सिद्दीकी यांनी सांगितले. सलमान हे त्यांच्या मळीवस्ती (ता. फुलंब्री) येथून पहिलेच पदवीधर असल्याचे त्यांचे बंधू सईद पटेल यांनी सांगितले.
यूपीएससी अभ्यासामुळे घडतो जागरुक नागरिक
यूपीएससी परीक्षेचा अभ्यास करून आपण ती परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रशासकीय सेवेत रुजू होऊच असे सांगता येत नाही. मात्र, या परीक्षांसाठी जो अभ्यासक्रम असतो, त्यातून एक जागरुक नागरिक नक्कीच घडतो, असे प्रांजळ मत लोकसेवा आयोग परीक्षेत यश मिळविणारे प्रणय प्रकाश नहार यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले. यूपीएससी परीक्षांमध्ये मराठवाड्यातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा सिंचन विभाग विश्रामगृह येथे बुधवारी दुपारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रा. एच. एम. देसरडा, ज्ञानप्रकाश मोदानी आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रणय यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी, मुलाखतीचा अनुभव या विषयांवर उपस्थितांशी चर्चा केली. बीडमधील संस्कार विद्यालयात शिक्षण घेतलेले प्रणय यांनी वयाच्या २२ व्या वर्षी चार्टर्ड अकाऊंटंट पदवी मिळविली त्यानंतर यूपीएससीची तयारी सुरू केली. तिसऱ्या प्रयत्नात त्यांना हे यश मिळाले. या परीक्षांची तयारी करणाºया विद्यार्थ्यांनी रोजचे वर्तमानपत्र, अग्रलेख, चालू घडामोडी या गोष्टी आवर्जून वाचाव्यात.