बस प्रवासात अभ्यास करून एमपीएससी परीक्षेत यश; एसटीची कर्मचारी झाली सहायक संचालक
By संतोष हिरेमठ | Published: September 14, 2023 07:03 PM2023-09-14T19:03:39+5:302023-09-14T19:07:34+5:30
पत्र्याचे घर, नोकरी सांभाळून अभ्यास; एमपीएससी उत्तीर्ण होऊन सहायक संचालकपदी निवड
छत्रपती संभाजीनगर : पत्र्याचे घर, घरची परिस्थिती बेताची, तरीही परिस्थितीवर मात करून एसटी महामंडळात नोकरी मिळविली. या नाेकरीसाठी रोज अप-डाऊन आणि त्यासाठी एसटीचा प्रवास. याच प्रवासात एमपीएससी परीक्षेचा अभ्यास केला आणि अखेरीस यश मिळविले. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग सहायक संचालकपदी निवड झाली अन् आयुष्याच्या यशाचा ‘टाॅप गिअर’ पडला. ही यशस्वी भरारी आहे शीतल गायकवाड यांची.
शीतल रमेश गायकवाड या एसटी महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर विभागातील कन्नड आगारात सहायक कार्यशाळा अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. शहरातील राजनगर, मुकुंदवाडी परिसरात त्या राहतात. वडील व्यवसायाने टेलर आहेत. अतिशय हलाखीची परिस्थिती असताना सर्व परिस्थितीवर मात करीत शीतल यांनी डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग, त्यानंतर बीई, एमई असे उच्च शिक्षण घेतले. २०१८मध्ये त्या एसटी महामंडळात सहायक कार्यशाळा अधीक्षक म्हणून रूजू झाल्या. कन्नड आगारात त्या कार्यरत आहेत. कामावर जाण्यासाठी रोज एसटीने अप-डाऊन करतात.
एसटी महामंडळाच्या नोकरीने त्यांना आधार दिला. परंतु, ही जबाबदारी पार पाडता पाडता त्यांनी भविष्याचाही वेध घेणे सुरू केले. ‘एमपीएससी’ परीक्षेची त्यांनी तयारी सुरू केली. कामासाठी रोज कन्नडला ये-जा करताना प्रवासातही त्या अभ्यास करीत असत. शिवाय मिळणाऱ्या प्रत्येक वेळेचा सदुपयोग अभ्यासासाठीच करीत असत. ‘एमपीएससी’ची ६ मे रोजी परीक्षा झाली. २२ ऑगस्ट रोजी मुलाखत झाली आणि ३१ ऑगस्ट रोजी निकाल जाहीर झाला. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग सहायक संचालकपदी निवड झाली. त्यांच्या यशाबद्दल एसटी महामंडळातून त्यांचे कौतुक होत आहे.
शिक्षण महत्त्वाचे
परिस्थिती कोणतीही असो, शिक्षण घेणे हे महत्त्वाचे आहे. सर्व परिस्थितीवर मात करून पुढे गेले पाहिजे. त्यासाठी अभ्यासाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. यातूनच प्रत्येक विद्यार्थी यश मिळवू शकतो.
-शीतल गायकवाड