कृषीकन्यांची भरारी! एकाच गावच्या तिघी झाल्या पोलीस, पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 04:30 PM2023-04-24T16:30:13+5:302023-04-24T16:30:31+5:30
गावकऱ्यांनी केला जल्लोष, ग्रामपंचायत कार्यालयात तिघींचा सत्कार करण्यात आला
- रऊफ शेख
फुलंब्री ( छत्रपती संभाजीनगर) : तालुक्यातील कान्होरी गावातील तीन मुलींची नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीत निवड झाली आहे. विशेष म्हणजे, या तिघी जिवलग मैत्रिणी आहेत. तिन्ही शेतकरी कन्येने मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर यश मिळवत पोलीस होण्याचे स्वप्न साकार केल्याने गावात आनंदाचे वातावरण आहे. या अभिमानास्पद कामगिरीमुळे ग्रामस्थांच्यावतीने तिघींचाही सत्कार करण्यात आला.
सोनाली रामराव म्हस्के, ज्योती मानसिंग बारवाल आणि दुर्गा सुरेश म्हस्के अशी तिघींची नाव आहेत. कान्होरी गावात राहून पोलीस होण्याचे स्वप्न तिघींनी पाहिले. हे स्वप्न साकार करण्यासाठी जिद्दीने सराव सुरु केला. सोबतच खाजगी शिकवणी लावली. तिघीही अत्यंत गरीब घरातील असून परिस्थिती बदलायचा निश्चय करून त्यांनी पोलीस होण्याचे ठरवलं. अखेर जिद्द आणि मेहनतीच्या बळावर त्यांची पोलिस विभागात निवड झाली. सोनाली रामराव म्हस्केची अकोला, ज्योती मानसिंग बारवालची ठाणे तर दुर्गा सुरेश म्हस्केची रायगड येथे निवड झाली आहे.
मेहनतीला यश, पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू
शालेय जीवनापासूनच पोलीस होण्याचे स्वप्न होते. कॉलेज होताच थेट भरतीची तयारी केली. मेहनतीला यश आल्याने आनंद होत असल्याच्या भावना यावेळी तिघींनी व्यक्त केल्या. दरम्यान, तिघींच्या पालकांकडे जेमतेम शेती आहे. शेतीवर उदरनिर्वाह होत नसल्याने ते मजुरी देखील करतात. मुली पोलीस झाल्याचे कळताच पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तराळले.
ग्रामस्थांनी पालकांसह केला सत्कार
तिघींना सरकारी नोकरी लागल्याचे कळताच गावात आनंदाचे वातावरण आहे. या अभिमानास्पद कामगिरीबद्दल गावकऱ्यांनी तिन्ही मुलींचा पालकांसह सत्कार केला. यावेळी सरपंच कांताबाई म्हस्के, उपसरपंच बापुराव म्हस्के, बाळू साळवे, महादू आहेर, अशोक वखरे, हरी म्हस्के, कल्याण डांगर, अंबादास जाधव, सोमीनाथ लगड, साहेबराव म्हस्के, संतोष सोटम, देवलाल राजपूत, मधुकर साळवे, श्रीराम म्हस्के, भरत ठोकळ, सुमित साळवे, विजय बारवाल यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.