बागला ग्रुपची यशोगाथा : मेहनत, सचोटीने नावारूपास आलेले ‘उद्योग तपस्वी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 06:13 PM2019-03-13T18:13:40+5:302019-03-13T18:21:30+5:30
पाच लाख रुपयात सुरू झालेला व्यवसाय ३० वर्षात ९०० कोटीवर पोहोचला आहे.
औरंगाबाद : कोलकाता येथील ज्यूट मिल बंद पडल्यानंतर औरंगाबादचा रस्ता पकडलेल्या राजनारायण बागला यांनी पाच लाख रुपये गुंतवणूक करत औरंगाबाद इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीची १० आक्टोबर १९८६ साली स्थापना केली. तेव्हापासून सुरू झालेला उद्योग प्रवास ९०० कोटींवर पोहोचला. यात ऋषी बागला यांची मेहनत, सचोटी आणि तपश्चर्या आहे.
ऋषि बागला यांचे वडील पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील रहिवासी. कुटुंबाचा ज्यूट मिलचा व्यवसाय होता. हा व्यवसाय बंद पडला. कुटुंब विभक्त झाले. तेव्हा राजनारायण बागला यांनी औरंगाबादेत येण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार ते औरंगाबादेत दाखल झाले. तेव्हा औरंगाबादेत बजाज ऑटो कंपनीच्या उद्योग उभारणीस सुरुवात झाली. याच कंपनीच्या दुचाकी वाहनांसाठी अॅल्युमिलियम डायकास्टचे (मॅग्नटो) उत्पादन सुरू केले. यासाठी त्यांनी औरंगाबाद इलेक्ट्रिकल्स लि. ची स्थापना केला. १९८९ साली ऋषी बागला हे कोलकाता येथील सेंट झेवियर्स महाविद्यालयातून वाणिज्य शाखेत पदवी संपादन करून औरंगाबादेत दाखल झाले. त्यांनी वडिलांच्या व्यवसायात मदत करण्यास सुरुवात केली.
सुरुवातीला त्यांनी कंपनीची सहव्यवस्थापकीय संचालकपदाची धुरा सांभाळली.१९९० साली व्हिडीओकॉन कंपनीच्या वॉशिंग मशीनसाठी शाफ्टचे उत्पादन सुरु केले. १९९३ साली औरंगाबाद मोटर्सची स्थापना करून केनस्टारसाठी छोट्या आकाराच्या कुलरची निर्मिती सुरू केली. २००० साली तैवानच्या लीन ईलक्ट्रिकल्स कंपनीशी करार करून रिले बनवणे सुरू केले. अशा पद्धतीने बागला ग्रुपमध्ये १२ कंपन्यांची उभारणी केली. २००९ साली राजनारायण बागला यांचे निधन झाले. हा ऋषी बागला यांच्यासाठी मोठा धक्का होता. या धक्क्यातून सावरत त्यांनी उद्योगविस्तार सुरूच ठेवला. पाच लाख रुपयात सुरू झालेला व्यवसाय ३० वर्षात ९०० कोटीवर पोहोचला आहे. औरंगाबाद शहराच्या सांस्कृतिक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान असणाऱ्या कलासागर संस्थेच्या निर्मितीतही त्यांचा सहभाग होता. अॅटोमोबाईल क्षेत्रात भूमिका बजावणाऱ्या या उद्योगपतीला महाराष्ट्र शासनाने ‘उद्योगरत्न’ पुरस्काराने गौरविले आहे.
चांगला निर्णय
ऋषी बागला यांच्याकडे भविष्यात या व्यवसायाचा व्याप सांभाळण्यासाठी वेळ नाही. त्यामुळे त्यांनी योग्यवेळी योग्य निर्णय घेतला आहे. महिंद्रा ‘सीआयए’ला या उद्योगात रस असल्यामुळे त्यांनी हा प्लॅन विकत घेतला. ते या प्रकल्पात आणखी गुंतवणूक करतील. हा बागला आणि महिंद्रा या दोघांसाठीही चांगला निर्णय आहे.
- राम भोगले, अध्यक्ष, सीएमआयए
औरंगाबादसाठी चांगली बातमी
महिंद्रा ‘सीआयए’ने औरंगाबाद इलेक्ट्रिकल कंपनी विकत घेतली, ही औरंगाबादसाठी चांगली बातमी आहे. ‘महिंद्रा’चा हा निर्णय चांगला राहील.
- राहुल धूत, व्यवस्थापकीय संचालक, धूत ट्रान्समिशन प्रा. लि.