महिलांच्या आंदोलनास यश; शार्दूलवाडी येथील हातभट्टी दारूच्या अड्ड्यावर पोलीसांची धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 07:38 PM2019-02-19T19:38:57+5:302019-02-19T19:40:05+5:30
या प्रकरणी एका जणाविरूध्द गुन्हा दाखल करून त्यास गजाआड करण्यात आले.
खुलताबाद (औरंगाबाद ) : तालुक्यातील शार्दूलवाडी येथील माटेगाव धरण परिसरात गावठी दारूचा अड्डा खुलताबाद पोलीसांनी आज उध्वस्त केला. या ठिकाणचे दोनशे लीटर दारूचे रसायन नष्ट करून एका जणाविरूध्द गुन्हा दाखल करून त्यास गजाआड करण्यात आले.
वेरूळ ग्रामपंचायत असलेल्या शार्दूलवाडी परिसरातील माटेगाव धरण परिसरात गेल्या अनेक महिन्यापासून काहीजण गावठी हातभट्टी दारूचा अड्डा चालवत होते. तसेच याच ठिकाणी दारूची विक्री केली जात असल्याने शार्दूलवाडी येथील अनेक लहाण, मोठे जण व्यसनाधीन झाले. यामुळे गावात व घराघरात भांडणे सुरू झाल्याने गावातील महिलांनी हा अड्डा बंद करावा यासाठी सोमवारी खुलताबाद पोलीस स्टेशन गाठून कैफियत मांडली होती.
आज खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार वाल्मीक कांबळे, हनुमंत सातपुते, मगरे यांनी माटेगाव धरणाजवळील गावठी हातभट्टी अड्ड्यावर छापा मारला. यावेळी 8 हजार 750 रूपये किमंतीचे दारू बनविण्याचे दोनशे लीटर रसायन नष्ट केले व दारू अड्डा उध्वस्त केला. याप्रकरणी हातभट्टी चालक शिवाजी नाना मिसाळ (27) यास ताब्यात घेऊन त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान खुलताबाद पोलीसांच्या कारवाईमुळे शार्दूलवाडी येथील महिलांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.