अशी असेल गणेश मंडळांसाठी पोलिसांची आचारसंहिता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 05:50 PM2019-09-04T17:50:54+5:302019-09-04T17:52:44+5:30
शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याचा उद्देश
औरंगाबाद : जातीय सलोखा कायम ठेवून सतत सर्वधर्मसमभाव जोपासणारे हे शहर सामाजिक बांधिलकी सांभाळते. संपूर्ण शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, सर्व जनतेला सुरक्षित व शांततापूर्ण जीवन लाभावे यादृष्टीने पोलीस आयुक्तालयाकडून प्रत्येक गणेश मंडळासाठी गणेशोत्सवासाठी आचारसंहिता तयार करण्यात आली आहे. सामाजिक व सार्वजनिक स्वास्थ्य राखण्यास त्याची मदत होईल, असे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी मंगळवारी जाहीर केले आहे.
अशी असेल आचारसंहिता
- धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी आवश्यक, ताळेबंदाबाबत पूर्तता करावी, धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीशिवाय वर्गणी सक्तीने गोळा करू नये, गणपतीपुढील मंडपाने रहदारीस अडथळा होऊ नये, ना हरकत प्रमाणपत्र हवे.
- सजावटीस आग लागू नये, याची दक्षता घ्यावी, इतर धर्मीयांच्या भावना दुखावल्या जातील, अशी सजावट नसावी, प्रखर तेजाचे दिवे टाळावेत, रोषणाईत शॉर्टसर्किट होणार नाही, याची काळजी घ्यावी, पर्यायी प्रकाशाची व्यवस्था ठेवावी
- देखाव्याची माहिती संबंधित ठाण्याला कळवावी, उत्सवकाळातील कार्यक्रमांची माहिती पोलिसांना द्यावी, बंदोबस्त देणे सोयीचे होऊ शकते.
- लाऊडस्पीकरसाठी ठाण्यातून परवानगी आवश्यकच, बीभत्स गाणी नको, ध्वनिक्षेपण रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत करता येणार नाही, मूर्तीची देखभाल जबाबदारी मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांनी २४ तास करावी. त्यांची नावे प्रत्येक दिवशी कागदावर लिहून ठेवावीत.
- गणपती देखावे आक्षेपार्ह असू नयेत, तिकीट शो असल्यास जिल्हाधिकारी कार्यालय करमणूक शाखेकडून परवानगी घ्यावी. मिरवणूक देखाव्यात विजेच्या तारांचा संपर्क होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
- मद्यपान, बीभत्स वर्तन करणाऱ्यास पोलिसांच्या ताब्यात द्यावे. करमणुकीच्या कार्यक्रमात संयोजकांनी दोर लावून बंदोबस्त ठेवावा. मंडपात मेणबत्ती, दिवा, अगरबत्ती सुरक्षित असावी.
- विसर्जन मिरवणुकीसाठीच्या वाहनाचे आरटीओकडून तपासून प्रमाणपत्र घ्यावे. देखावे पाहणाऱ्यासाठी सुरक्षा असावी.
- मंडप व विसर्जन विहिरीजवळ फटाके फोडू नयेत. विसर्जनस्थळी प्रकाशव्यवस्था आहे; परंतु लहान मुलांना जपावे, पाण्यात उतरू देऊ नये. बेवारस वस्तूविषयी पोलिसांना कळवावे. मदतीसाठी स्थानिक पोलीस चौकी, ठाणे, नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.
- मूर्तीशेजारी खाद्यपदार्थ ठेवू नयेत. वाहन बंद पडू नये याची दक्षता घ्यावी, वाहनावर मंडळ, अध्यक्ष-सचिवाची नावे लिहावीत, खिसेकापूपासून सावधान, अफवा पसरवू नका.
- मिरवणूक अथवा देखावे पाहायला जाताना महिलांनी दागिने परिधान करणे टाळावे, मुलांना एकटे सोडू नका, मंडळाच्या स्वयंसेवक व कार्यकर्त्यांनी मद्य प्राशन करू नये, आरती सावधपणे हाताळावी, महिला-मुलींची छेडछाड होऊ नये, याची दक्षता घ्यावी, आरतीमध्ये अपरिचित व्यक्तीकडून प्रसाद, नैवेद्यासाठी मिठाई, पूजेसाठीची फुले स्वीकारू नयेत.
- कार्यकर्ते, स्वयंसेवकांना फोटो पास द्यावेत, विसर्जन मिरवणूक लवकर काढून रात्री १२ वाजेपर्यंत पूर्ण करावी, मिरवणुकीत बैलगाडीचा वापर टाळावा, आगीचा बंब, रुग्णवाहिका, पोलीस वाहने सहजपणे जाऊ शकतील एवढी जागा मंडपाच्या बाजूला ठेवावी.
- जुगार व अवैध धंदे, दारू, मटका, संशयास्पद व्यक्ती, समाजकंटकांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून नियंत्रण कक्ष व स्थानिक पोलिसांना संपर्क साधवा.