असा अधिकारी हवा; स्वच्छतेसाठी महापालिका आयुक्त स्वत:च उतरले नाल्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 03:40 PM2019-12-19T15:40:17+5:302019-12-19T15:42:41+5:30
कॅरिबॅगने भरलेला नाला लोकसहभागाने अर्ध्या तासात झाला स्वच्छ
औरंगाबाद : सकारात्मक इच्छाशक्ती ठेवून कामाला सुरुवात केल्यास यश हमखास मिळते. त्यात लोकसहभागाची भर पडल्यास जादूची कांडी फिरविल्यासारखे होते, असा संदेश आज मिसारवाडी भागातील आरतीनगर येथे मनपा आयुक्त आस्तिकुमार पाण्डेय यांनी दिला. या भागातील एका नाल्यात कॅरिबॅगचे साम्राज्य पाहून आयुक्त स्वत: साफसफाई करायला लागले. बघता बघता नागरिकांच्या सहकार्याने अर्ध्या तासात नाला स्वच्छ झाला.
आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी पदभार स्वीकारताच लोकसहभागातून बदल घडविणार असल्याचे म्हटले होते. बुधवारी आयुक्तांनी प्रभाग-५ मधील आंबडेकरनगर, एन-९ अयोध्यानगर, एन-७ रेणुकामाता मंदिर, मिसारवाडी, आरतीनगर या भागांत पाहणी केली. आरतीनगर येथे ते पाहणी करीत असताना जिकडे तिकडे कचरा, दुर्गंधी पाहून त्यांनी मनपा अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. याच भागात एका नाल्यात कॅरिबॅगचा मोठा खच पडलेला होता. नाल्याची ही दुरवस्था पाहताच आयुक्त पाण्डेय थेट नाल्यात उतरले. सोबतचे अधिकारी, नगरसेवक, कर्मचारी व नागरिक क्षणभर अवाक झाले. यावेळी त्यांनी स्वत: कचरा उचलण्यास सुरुवात केली. हे दृश्य पाहून मनपा अधिकारी, लोकप्रतिनिधी, सर्वसामान्य नागरिकही स्वच्छता करू लागले. अवघ्या अर्ध्या तासात नाला स्वच्छ झाला. यावेळी नगरसेविका ज्योती पिंजरकर, संगीता वाघुले, माजी नगरसेवक अनिल जैस्वाल, महेंद्र सोनवणे, करसंकलक व निर्धारक अधिकारी करणकुमार चव्हाण, उपायुक्त सुमंत मोरे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती.
लोकवर्गणीतून ड्रेनेज लाईन
आरतीनगरात मुख्य ड्रेनेज लाईनला अंतर्गत जोडण्या दिलेल्या नाहीत. पालिकेनेच हे काम करून द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली. त्यावर आयुक्त पाण्डेय म्हणाले, तुम्ही लोकवर्गणीतून ड्रेनेज जोडण्याचे साहित्य आणा. मदतीसाठी पालिकेचे कर्मचारी देतो.
निष्क्रिय कर्मचाऱ्यांना निलंबित करा
मिसारवाडीत अनेक मालमत्तांना निवासी कर लागलेला असताना प्रत्यक्षात वापर मात्र व्यावसायिक सुरू होता. हा प्रकार पाहून आयुक्त चांगलेच भडकले. निष्क्रिय अधिकारी, कर्मचाऱ्यांना निलंबित करा, असे आदेश आयुक्तांनी दिले.
पाचशे रुपये घरपट्टी घ्या
आंबेडकरनगर, मिसारवाडी येथील काही नागरिकांनी घरांना आकारला जाणारा मालमत्ताकर खूप जास्त असल्याचे सांगत आम्ही तो भरू शकत नाही. वर्षाला ५०० रुपये कर लावा, अशी मागणी केली.
पंचतारांकित हॉटेल बांधणे आपले काम नाही
मिसारवाडी, आरतीनगरातील कचरामय स्थिती पाहून आयुक्तांनी मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. शहरात पंचतारांकित हॉटेल, बंगले उभारणे हे पालिकेचे काम नाही. शहर स्वच्छ करणे, कचरा उचलणे, पाणीपुरवठा, ड्रेनेज साफ करणे हेच पालिकेचे काम आहे, अशा शब्दांत आयुक्तांनी अधिकाऱ्यांना आपल्या कामाची जाणीव करून दिली.
मालमत्तांचा डिजिटल डेटा हवा
शहरातील सर्व मालमत्तांचा डिजिटल डेटा व अॅप तयार करण्यासाठी अभियांत्रिकी, एमबीए, बीटेक, अशा विद्यार्थ्यांना आवाहन करून त्यांची मदत घ्या. हे काम त्यांच्याकडून मोफत करावे लागेल. पालिकेकडून त्यांना अनुभवाचे प्रमाणपत्र दिले जाईल. यासाठी १५ दिवस किंवा जास्तीत जास्त ६ महिन्यांपर्यंत विद्यार्थी पालिकेत काम करून मदत करू शकतात. शहरातील हुशार विद्यार्थी घ्या, ते पालिकेसाठी काय करू शकतात, त्यासंबंधीचा एमओयू करून घ्या, असेही आयुक्तांनी आदेशित केले.