अशी झाली फजिती; बाजीराव बसले लोटा घेऊन, चोरांनी मोबाइल नेला हिसका देऊन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 07:28 PM2022-03-29T19:28:50+5:302022-03-29T19:29:35+5:30

गंगापूर तालुक्यातील सिद्धपूरची घटना; लोकलज्जेच्या भीतीने दिली नाही तक्रार

Such was the humiliation; Bajirao sat down with Lota, the thieves took the mobile and snatched it | अशी झाली फजिती; बाजीराव बसले लोटा घेऊन, चोरांनी मोबाइल नेला हिसका देऊन

अशी झाली फजिती; बाजीराव बसले लोटा घेऊन, चोरांनी मोबाइल नेला हिसका देऊन

googlenewsNext

- जयेश निरपळ
गंगापूर : मोबाइलच्या व्यसनाने एखाद्या वेळी कशी फटफजिती होते, याची प्रचिती गंगापूर तालुक्यातील सिद्धपूर येथे एका इसमाला चांगलीच आली. उघड्यावर बसून शौच करणारा हा इसम मोबाइलवरूनही बोटे चाळीत होता. तेवढ्यात चोरट्यांनी त्याच्या हातातील मोबाइल हिसकावून पोबारा केला. नंतर गावकऱ्यांच्या मदतीने यातील एका चोराला पकडल्याने मोबाइल मिळाला, मात्र ही घटना गावात सगळीकडे हसून चवीने चघळली जात असल्याचे पाहून हा इसम मात्र खजील झाला होता.

मोबाइलचे वेड नुसते शहरी भागातील नागरिकांनाच लागले आहे असे नाही, तर ग्रामीण भागातील तरुणांसह मध्यमवयीन व वृद्धांनाही आता मोबाइलशिवाय करमेनासे झाले आहे. हे व्यसन एवढे घट्ट आहे की, खाताना, बसताना, झोपताना तरुणांना मोबाइलशिवाय काहीही सुचत नसल्याचे दिसत आहे.

सिद्धपूर येथील बाजीराव (नाव बदललेले आहे) हे शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास रस्त्याच्या कडेला उघड्यावर लोटा घेऊन मोकळे होण्यासाठी गेले होते. मोकळे होतानाही बाजीराव आपल्या १८ हजारांच्या मोबाईलवरून बोटे फिरवीत होते. पण तेवढ्यात तीन अनोळखी तरुण दुचाकीवरून त्यांच्याजवळ येऊन थांबले. बाजीराव मोबाइलमध्ये गुंग असल्याचे पाहून त्यांनी त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून पोबारा केला. बाजीराव आवरसावर करेपर्यंत चोरटे अंधारात गायब झाले. मात्र ते चोर गडबडीत गावाच्या दिशेने गेले होते. बाजीरावांनी लाजत-काजत गावातील तरुणांना आपबीती सांगितली. तरुणांनी त्या मार्गाच्या वस्तीवरील नागरिकांना फोन केला व मोबाइल लांबविणारे पकडले गेले. त्यातील दोघे अंधाराचा फायदा घेऊन पळाले, मात्र मोबाइलसह मुख्य सूत्रधार सापडला.

‘आरं पण तिथं कोणी मोबाइल पाहतं का?’
उघड्यावर शौच करीत असताना चोरट्यांनी मोबाइल पळविल्याची घटना तात्काळ गावात पसरली होती. यामुळे बाजीरावांच्या इज्जतीचा चांगलाच पंचनामा झाला. ‘आरं पण तिथं कोणी मोबाइल पाहतं का?, घरी येऊन पाहायचा ना...’ असे म्हणून काही वृद्धांनी बाजीरावांना खडसावले. यामुळे बाजीरावांना काय बोलावे काहीच सुचत नव्हते. चोरटा पकडल्यानंतर मात्र खजील झालेल्या बाजीरावांनी या चोरट्याला चांगलाच चोप देऊन भडास काढली. इज्जतीचा आणखी पंचनामा नको, म्हणून पोलिसांत न देता त्यांनी चोरट्याला सोडून दिले.

गावांमधील टमरेल जाता जाईना...
गावांसह शहरे आता डिजिटल क्रांतीकडे जात आहेत. मात्र अद्यापही गावांमधील टमरेल काही गेले नसल्याचे सिद्धपूरमधील घटनेवरून दिसून येत आहे. मोबाइल पकडणाऱ्या हाताला टमरेलमुक्त करण्यासाठी शासन स्तरावर अनेक उपक्रम राबविले जातात, मात्र नागरिकांना त्याचा काही फरक पडत नाही.
 

Web Title: Such was the humiliation; Bajirao sat down with Lota, the thieves took the mobile and snatched it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.