गुळगुळीत रस्त्यावर अचानक धक्क्यावर धक्के; मणक्यांचा होतोय खुळखुळा

By मुजीब देवणीकर | Published: May 4, 2023 03:17 PM2023-05-04T15:17:56+5:302023-05-04T15:20:42+5:30

स्मार्ट सिटीच्या रस्त्यांना थर्ड पार्टी इन्स्पेक्शन म्हणून आयआयटी पवईची नेमणूक केली. त्यानंतरही कामात गुणवत्ता नाही.

Sudden bumps on the smooth road; The spine is becoming loose | गुळगुळीत रस्त्यावर अचानक धक्क्यावर धक्के; मणक्यांचा होतोय खुळखुळा

गुळगुळीत रस्त्यावर अचानक धक्क्यावर धक्के; मणक्यांचा होतोय खुळखुळा

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : शहरात मागील काही वर्षांपासून सिमेंट रस्ते मोठ्या प्रमाणात तयार करण्यात येत आहेत. रस्ते तयार करताना सुरुवातीचा भाग आणि शेवटचा भाग निमुळता केला जात नाही. त्यामुळे वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. रस्ते तयार करणाऱ्यांच्या दृष्टीने ही अतिशय क्षुल्लक बाब असली तरी नागरिकांच्या मणक्यांचा अक्षरश: खुळखुळा होताेय.

मागील दहा वर्षात माजी नगरसेवकांनी आपल्या वॉर्डांमधील बहुतांश रस्ते सिमेंटचे केले. त्यानंतर महापालिकेने राज्य शासनाच्या अनुदानातून आतापर्यंत २७४ कोटी रुपये खर्च करून सिमेंट रस्ते केले. सध्या स्मार्ट सिटीमार्फत १८० कोटींच्या रस्त्यांची कामे सुरू आहेत. मनपाच्या निधीतून १०० कोटींची कामे लवकरच सुरू होणार आहेत. याशिवाय आमदार, खासदार आणि विशेष शासन निधीतून असंख्य कामे करणे सुरू आहे. सिमेंट रस्त्याची कामे करणे अत्यंत सोपे झाले. त्यामुळे कंत्राटदारांसह राजकीय मंडळींच्या या कामांवर उड्या पडत आहेत.

जाणीवपूर्वक दुर्लक्ष म्हणावे का?
सिमेंट रस्ता जिथून सुरू होतो, तेथे वाहनधारकांना चढताना योग्य उतार करायला हवा. त्याचप्रमाणे रस्ता जिथे संपतो, तेथेही सिमेंटचा उतार करावा. जेणेकरून वाहनधारकांना त्रास होणार नाही. मात्र ही काळजी कोणीही घेत नाही. स्मार्ट सिटीच्या रस्त्यांची उंची तर चक्क दीड ते दोन फूट आहे. तेथेही हा प्रकार पाहायला मिळतोय. महिलांना याचा सर्वाधिक त्रास होतोय.

कामानंतर पाहणीही नाही
स्मार्ट सिटीच्या रस्त्यांना थर्ड पार्टी इन्स्पेक्शन म्हणून आयआयटी पवईची नेमणूक केली. त्यानंतरही कामात गुणवत्ता नाही. मनपा अधिकारी तर काम झाल्यावर सिमेंट रस्त्यांची पाहणी सुद्धा करीत नाही. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतोय.

मणक्याला सर्वाधिक धोका
दुचाकीचालक असो की चारचाकी चालक, अशा रस्त्यावरून ये-जा करताना मणक्याच्या गादीला झटका बसून गादी सरकू शकते. अशा रस्त्यांच्या परिसरातील रहिवाशांना तेथून वारंवार ये-जा करावी लागते. त्यामुळे त्यांंना याचा अधिक त्रास होऊ शकतो. चिंताजनक म्हणजे गरोदर मातांना त्याचा अधिक धोका आहे.
- डाॅ. यशवंत गाडे, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन आणि अस्थिरोग तज्ज्ञ

लवकरच कामांना मंजुरी 
शहरात आतापर्यंत जिथे सिमेंट रस्ते तयार केले, तेथे हा गंभीर प्रकार लक्षात आला आहे. विविध वसाहतींमधील नागरिकांना मुख्य रस्त्यावर ये-जा करताना त्रास होतोय. हा त्रास कमी करण्यासाठी अंदाजपत्रक तयार करण्याची सूचना सर्व वॉर्ड अभियंत्यांना दिली आहे. लवकरच कामांना मंजुरी घेऊन हा त्रास कमी केला जाईल.
-ए.बी. देशमुख, शहर अभियंता.

Web Title: Sudden bumps on the smooth road; The spine is becoming loose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.