वाशी पाेलीस ठाण्याच्या आवारात अचानक स्फाेट; दुकानांसह घरांच्या भिंतीला तडे गेले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 19:20 IST2025-01-09T18:27:31+5:302025-01-09T19:20:55+5:30
पाेलिस ठाण्याच्या आवारातील रिकाम्या जागेत झालेल्या स्फाेटाची तीव्रता प्रचंड हाेती.

वाशी पाेलीस ठाण्याच्या आवारात अचानक स्फाेट; दुकानांसह घरांच्या भिंतीला तडे गेले
वाशी (जि. धाराशिव) : येथील पाेलिस ठाण्याच्या आवारात साधारणपणे सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अचानक स्फाेट झाला. हा आवाज एवढा माेठा हाेता की, परिसरातील घरे, दुकानांच्या खिडकीच्या काचा फुटल्या. तसेच भिंतींना तडे गेले आहेत. दरम्यान, कशाचा स्फाेट झाला? याचा तपास घेण्यासाठी बाॅम्बशाेधक पथकास पाचारण केले आहे.
वाशी पाेलीस ठाण्याच्या पूर्वेकडील भागात जगदाळे काॅम्प्लेक्स आहे. पूर्वी या ठिकाणी पाेलिस कर्मचाऱ्यांची वसाहत हाेती. काही दिवसांपूर्वीच ती जमीनदोस्त करण्यात आली हाेती. पाेलिस यंत्रणेच्या या खुल्या जागेला लागूनच जगदाळे यांच्या मालकीचे पत्र्याचे शेड आहे. या ठिकाणी विविध दुकाने आहेत तर बाजूलाच पक्की घरे आहेत. दरम्यान, बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास याच जागेत अचानक स्फोट झाला. ठिकाणी मोठा खड्डा पडला आहे. स्फोटाची तीव्रता माेठी असल्याने शेजारील मोबाईल दुकानातील स्क्रीन, ग्राहक सेवा केंद्रातील काचेच्या टेबलासह अन्य साहित्य फुटले आहे. एवढेच नाही तर घरांचे लाकडी दरवाजे तुटले असून भिंतींना तडे गेले आहेत. साधारणपणे १ हजार मीटर अंतरातील घरांसह दुकानांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, हा स्फाेट कशाचा हाेता? याचा तपास घेण्यासाठी बाॅम्बशाेधक तसेच श्वानपथकास पाचारण करण्यात आले आहे. या स्फाेटामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
काच फुटून महिलेच्या डाेळ्यास लागली
पाेलिस ठाण्याच्या आवारातील रिकाम्या जागेत झालेल्या स्फाेटाची तीव्रता प्रचंड हाेती. या स्फाेटामुळे ग्राहक सेवा केंद्राच्या खिडकीची काच फुटून आतमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याच्या डाेळ्यावर लागली.
बाॅॅॅम्बशाेधक, निकामी पथक स्पॉटवर
पाेलिस ठाण्याच्या परिसरात झालेल्या स्फाेटाची कल्पना तातडीने वरिष्ठांना देण्यात आली तसेच स्फाेटाच्या तपासकामी बाॅम्बशाेधक व निकामी पथक तसेच श्वानपथकास पाचारण करण्यात आले आहे. या पथकाच्या अहवालानंतरच कशाचा स्फाेट झाला, हे सांगता येईल.
-संग्राम थाेरात, पाेलिस निरीक्षक, वाशी.