शेवटच्या सभेतही ऐनवेळचा ठराव मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 01:04 AM2017-10-18T01:04:44+5:302017-10-18T01:04:44+5:30
महापौर बापू घडमोडे यांनी सर्वसाधारण सभेत ऐनवेळी अनेक प्रस्ताव मंजूर करून महापालिकेत एकच खळबळ उडवून दिली आहे. सोमवारी शेवटच्या सर्वसाधारण सभेतही महापौरांनी ऐनवेळी एक ठराव मंजूर केलाच
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महापौर बापू घडमोडे यांनी सर्वसाधारण सभेत ऐनवेळी अनेक प्रस्ताव मंजूर करून महापालिकेत एकच खळबळ उडवून दिली आहे. सोमवारी शेवटच्या सर्वसाधारण सभेतही महापौरांनी ऐनवेळी एक ठराव मंजूर केलाच. एका बडतर्फ अधिका-याला आर्थिक लाभ देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
मनपातील एका वरिष्ठ अधिका-याला २०१२ मध्ये सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. शासनाकडून ही बडतर्फी रद्द ठरवण्यात आल्यानंतर त्यांना जानेवारी २०१६ मध्ये पुन्हा सेवेत घेण्यात आले. त्यांना विभागीय चौकशी प्रक्रियेतून दोषमुक्त करण्यात येत असल्याबद्दलचा हा प्रस्ताव आहे. तो शासकीय प्रस्ताव आहे आणि तो आयुक्तांनी विधिवत विषय पत्रिकेवर ठेवायला हवा होता. तसे झाले असते तर सदस्यांकडून यास विरोध होणार हे स्पष्ट होते. त्यामुळे महापौरांनी तो ऐनवेळी घेतला. सभागृहात हा ठराव मंजूरही करण्यात आला. यापूर्वी महापौरांनीच ऐनवेळी एकही ठराव घेणार नाही, अशी घोषणा केली होती. शेवटच्या सभेत स्वत:च्या घोषणेवरच महापौर ठाम राहिले नाहीत. महापौरांनी १३२९ क्रमांकाचा ठराव सोमवारी मंजूर केला आहे. २० जुलैच्या सर्वसाधारण सभेत चार ऐनवेळीचे वादग्रस्त ठराव मंजूर करण्यात आले होते. त्यातील एक ठराव रद्द करण्यात आला.