सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील ५ वर्षीय मगरीचा अचानक मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 12:33 PM2019-12-17T12:33:47+5:302019-12-17T12:36:20+5:30
पाण्यात उलटी तरंगत असताना प्राणिसंग्रहालय प्रशासनाच्या आले निदर्शनास
औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील पाचवर्षीय मगरीचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला. मगरीचे सरासरी आयुष्यमान ५० वर्षांचे असते. मरण पावलेल्या मगरीचे आई-वडील, भावंडे जिवंत आहेत. ती मरण पावल्यानंतर पाण्यात उलटी तरंगत असताना प्राणिसंग्रहालय प्रशासनाच्या निदर्शनास आले. जोपर्यंत ती आजारी असल्याचेही माहीत नव्हते. मृत्यूनंतर मगरीची उत्तरीय तपासणी केल्यानंतर तिची किडनी फेल झाल्याचे अहवालात नमूद केले आहे.
सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयात एकूण पाच मगरी होत्या. येथे दररोज हजारो चिमुकले येतात. मगर पाहण्यासाठी बच्चेकंपनी अलोट गर्दी करतात. एका १४ वर्षीय मादी मगरीने २०१४ मध्ये आज मरण पावलेल्या मगरीला जन्म दिला होता. ती पाच वर्षांची झाली होती. या मगरींसाठी प्राणिसंग्रहालय प्रशासनाने स्वतंत्र व्यवस्था केली आहे. सोमवारी सकाळी ७ वाजता पाचवर्षीय मगर पाण्यात उलटी होऊन तरंगत असल्याचे कर्मचा-यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी खडकेश्वर येथील पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयातील अधिका-यांना बोलावले. मगरीचे शवविच्छेदन डॉ. अश्विनी राजेंद्र यांनी केले. यावेळी प्राणिसंग्रहालय पशुवैद्यक डॉ. नीती सिंह उपस्थित होत्या. शवविच्छेदनाच्या वेळी मगरीच्या अवयवाचा नमुना पुढील तपासणीकरिता घेण्यात आला. त्यानंतर वन अधिकारी एस. बी. चव्हाण यांच्यासमक्ष मगरीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. किडनीच्या आजारामुळे मगरीचा मृत्यू झाल्याचे उत्तरीय तपासणीतून समोर आल्याचे प्राणिसंग्रहालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
चार मगर शिल्लक
मगरीचे वय सरासरी ५० वर्षे असते. प्राणिसंग्रहालयात मृत पावलेली मगर ही अवघ्या पाच वर्षांची होती. या मगरीचा जन्म प्राणिसंग्रहालय येथे १० जुलै २०१४ रोजी झाला होता. आता प्राणिसंग्रहालयात ४ मगरी शिल्लक आहेत.