अचानक रेल्वे रद्द झाल्याचे धडकले मेसेज, हजारो प्रवाशांचे नियोजन विस्कळीत
By संतोष हिरेमठ | Published: November 15, 2022 07:38 PM2022-11-15T19:38:09+5:302022-11-15T19:40:18+5:30
तिकिट आरक्षित केलेल्या प्रवाशांना सकाळीच रेल्वे रद्द झाल्याचे मेसेज येऊन धडकले.
औरंगाबाद : मध्य रेल्वेमधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते कल्याण स्थानकदरम्यान आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते मस्जिद रेल्वे स्थानकादरम्यान लाईन ब्लॉक तसेच पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे १९ ते २१ नोव्हेंबरदरम्यान नांदेडहून मुंबईकडे आणि मुंबईहून नांदेडकडे धावणाऱ्या १२ रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. तर एक रेल्वे अंशत: रद्द करण्यात आली आहे. मुंबई आणि नांदेडला १९ ते २१ नोव्हेंबरदरम्यान तिकिट आरक्षित केलेल्या प्रवाशांना मंगळवारी रेल्वे रद्द झाल्याचे मेसेज येऊन धडकले.
आदिलाबाद-मुंबई नंदिग्राम एक्स्प्रेस १९ नोव्हेंबरदरम्यान दादर ते मुंबईदरम्यान रद्द करण्यात आली आहे. ही रेल्वे या दिवशी दादरपर्यंतच धावेल. १९ नोव्हेंबर रोजी मुंबईकडे जाणारी तपोवन एक्स्प्रेस, राज्यराणी एक्स्प्रेस, देवगिरी एक्स्प्रेस, २० नोव्हेंबर रोजी जनशताब्दी एक्स्प्रेस, तपोवन एक्स्प्रेस आणि २१ नोव्हेंबर रोजी नंदीग्राम एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.२० नोव्हेंबर रोजी मुंबईहून धावणारी तपोवन एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, नंदीग्राम एक्स्प्रेस, राज्यराणी एक्स्प्रेस, देवगिरी एक्स्प्रेस आणि २१ नोव्हेंबर रोजी तपोवन एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.