ऐन सणासुदीच्या दिवसांत साखरेचे दर भडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 07:07 PM2019-08-21T19:07:11+5:302019-08-21T19:11:57+5:30
किरकोळ विक्रीत साखर दरात किलोमागे २ रुपयांनी वाढ झाली आहे.
औरंगाबाद : श्रावण महिना, सणासुदीचे दिवस सुरू असताना साखरेचे भाव अचानक वाढले आहेत. किरकोळ विक्रीत साखर दरात किलोमागे २ रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या साखर प्रतिकिलो ३८ रुपयांना मिळत आहे. केंद्र सरकारने दीड लाख टनाने साखर कोटा कमी दिला, त्याचप्रमाणे महापुरामुळे कोल्हापूर, सांगलीऐवजी औरंगाबाद, नगर जिल्ह्यांतून राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात साखर जात आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून साखरेचे दर वाढले आहेत.
श्रावण महिना सुरू होताच एकापाठोपाठ एक अशी सणांची मालिकाच सुरू होऊन जाते. या काळात गोड पदार्थ बनविण्यासाठी साखरेला मोठी मागणी असते. साखरेच्या किमतीवर केंद्र सरकारचे नियंत्रण आहे. दर महिन्याला साखर कोटा जाहीर केला जातो. जुलै महिन्यासाठी सरकारने २० लाख ५० हजार टन साखर कोटा दिला होता. आॅगस्ट महिन्यासाठी कोटा घटून १९ लाख टन कोटा देण्यात आला. उल्लेखनीय म्हणजे जुलै महिन्यापेक्षा आॅगस्टमध्ये साखरेला जास्त मागणी असतानाही सुमारे दीड लाख टन साखर कमी देण्यात आली. यामुळे साखर कारखान्यांचे टेंडर जास्त दरात गेले. होलसेल व्यापाऱ्यांनीही साखरेचे भाव वाढविले.
महाराष्ट्रात कोल्हापूर येथील साखर कारखान्यातून मोठ्या प्रमाणात राजस्थान राज्यात साखर पाठविली जाते. मात्र, कोल्हापूर, सांगली येथे महापूर आल्याने व अनेक ठिकाणी साखरेच्या गोदामापर्यंत पाणी शिरल्याने तेथून माल वाहतूक बंद होती. परिणामी, अनेक वर्षांनंतर औरंगाबाद, नगर, कोपरगाव येथील साखर कारखान्यांतील साखरेला राजस्थानमधून मागणी आली. येथून मध्यप्रदेश, छत्तीसगढमध्ये साखर जात असते. आता राजस्थानमध्येही साखर जात असल्याने भाववाढीला हवा मिळाली. मागील १९ दिवसांत साखर क्विंटलमागे २५० रुपयांपर्यंत महागली. मोंढ्यात होलसेलमध्ये मंगळवारी साखर एस (लहान दाणे) ३,४५० रुपये, सुपर एस (मध्यम दाणे) ३,५६० रुपये, तर एम (जाड दाणे) ३,६४० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाली. यासंदर्भात जनरल किराणा मर्चंटस् असोसिएशनचे अध्यक्ष नीलेश सेठी म्हणाले की, सध्या औरंगाबादेत जाड साखर जास्त प्रमाणात विकते. मात्र, साखर कारखान्यात जाड साखर कमी प्रमाणात तयार होत आहे. परिणामी, एम व सुपर एस साखरेच्या भावात क्विंटलमागे ११० रुपयांची तफावत निर्माण झाली आहे. अनेक वर्षांनंतर एवढी मोठी तफावत बघण्यास मिळत आहे. कोल्हापूरमधील राजस्थानसाठी साखर पुरवठा पूर्ववत झाला नाही, तर आणखी भाववाढ होऊ शकते. किरकोळ विक्रीत किलोमागे २ रुपये भाववाढ होऊन साखर प्रतिकिलो ३८ रुपये विकली जात आहे.
शहरात दररोज २,५०० क्विंटल साखरेची विक्री
साखरेचे कमिशन एजन्ट राजेश कासलीवाल यांनी सांगितले की, औरंगाबादेत श्रावणाला सुरुवात झाल्यापासून साखरेची मागणी वाढली आहे. उन्हाळ्यात दररोज दीड हजार क्विंटल साखर विकली जात असे. सध्या दररोज २,२०० ते २,५०० क्विंटल साखर विकली जात आहे. दिवाळीपर्यंत ही मागणी वाढत जाईल.
मंगळवारी मोंढ्यात होलसेलमध्ये प्रतिक्विंटल विक्री भाव
साखर एस (लहान दाणे)
३,४५० रुपये
सुपर एस (मध्यम दाणे)
३,५६० रुपये
एम (जाड दाणे)
३,६४० रुपये