उसाच्या चाऱ्याने आरोग्यास धोका
By Admin | Published: March 31, 2016 12:12 AM2016-03-31T00:12:02+5:302016-03-31T00:35:37+5:30
बीड : छावणीतील जनावरांना गेल्या चार-पाच महिन्यांपासून केवळ चारा म्हणून उसाचे वाढे दिले जात आहेत. याचा विपरित परिणाम जनावरांच्या आरोग्यावर होत आहे.
बीड : छावणीतील जनावरांना गेल्या चार-पाच महिन्यांपासून केवळ चारा म्हणून उसाचे वाढे दिले जात आहेत. याचा विपरित परिणाम जनावरांच्या आरोग्यावर होत आहे. फॉस्फरस, कॅल्शियमचे प्रमाण कमी होत असून, शुगर वाढत आहे. परिणामी जनावरे भाकड होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
दुष्काळी परिस्थितीत चारा टंचाई निर्माण झाल्याने जिल्ह्यात २५६ छावण्या उभारण्यात आल्या आहेत. यामध्ये जवळपास अडीच लाख जनावरांची देखभाल केली जात आहे. सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये छावण्या सुरू झाल्याने उसाच्या वाढ्याशिवाय पर्याय नव्हता. फेब्रुवारी महिन्यात रबीची काढणी होऊन सुमारे ३ लाख ८३ हजार मे. टन एवढा चारा उपलब्ध झाला होता. त्यानुसार छावणीतील जनावरांना कडब्याचा चारा पुरविणे अपेक्षित होते.
वाढते दर असल्याने छावणी चालकही कडबा खरेदीकडे दुर्लक्ष करीत आहेत. परिणामी कडबा उपलब्ध असूनही तो इतर जिल्ह्यात विकला जात आहे. उस वाढ्याचा उपयोग पूरक आहार म्हणून करणे सोयीचे आहे; परंतु सातत्याने उसाचे वाढेच पुरविले गेल्याने फॉस्फरस, कॅल्शियमचे कमी होत असून, शुगर वाढत असल्याचे भाकीत परभणी येथील प्रयोगशाळेने व्यक्त केले आहे.
छावण्यांमध्ये उसाचे वाढ अन् बाजरीच्या सरमाडचा चारा म्हणून अधिक वापर होत आहे. त्यामुळे जनावरांची लागण क्षमताही कमी होत असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.