ऊसतोडणीचा व्यवहार झाला मोठ्या भावाशी, शिल्लक रक्कमेसाठी अपहरण केले लहान भावाचे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 05:32 PM2022-06-30T17:32:01+5:302022-06-30T17:34:15+5:30
बनोटी तांड्यावर सिनेस्टाइल अपहरणाची घटना : सोयगाव पोलीस ठाण्यात गुन्हा
सोयगाव (औरंगाबाद) : मोठ्या भावाकडे ऊसतोडीच्या व्यवहारातील राहिलेल्या दोन लाखांच्या वसुलीसाठी लहान भावाला बीड जिल्ह्यातील सहा जणांनी सिनेस्टाइलने अपहरण केल्याची घटना सोयगाव तालुक्यातील बनोटी तांडा येथे बुधवारी, दि.२९ सकाळी ९ वाजता घडली. आबा धनराज चव्हाण (३०, रा. बनोटी तांडा) असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून सोयगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
बनोटी परिसरातून अनेक कुटुंब उदरनिर्वाह करण्यासाठी दरवर्षी ऊसतोडणीसाठी विविध जिल्ह्यांत जात असतात. बनोटी तांडा येथील बाबू चव्हाण याने बीड जिल्ह्यातील काही मुकादमांकडून गेल्या वर्षी पाच लाख रुपये आणले होते. त्या बदल्यात मी तुम्हाला ऊसतोडीसाठी मजूर पाठवेल, असे ठरले होते. काही दिवसांनंतर ऊसतोडीसाठी मजूर घेऊन जाण्यावरून दोघांमध्ये वाद झाले. त्यामुळे मजूर गेले नसल्याने बाबू चव्हाण याने बीड येथील सदर मुकादमास तीन लाख वापस केले. तर दोन लाख माझ्याकडे आल्यानंतर परत करण्याची बोलणी झाली.
मात्र, पैसे देण्यावरून वाद सुरू असल्याने बीड जिल्ह्यातील मुकादमाची टोळी मंगळवारी रात्रीपासून कारने (क्र. एमएच २३ ९०००) बनोटीत आली होती. कारमधील सहा जणांनी बुधवारी सकाळी बाबू चव्हाण यांचा लहान भाऊ आबा धनराज चव्हाण यास शेतशिवारातून उचलून कारमध्ये टाकून पळ काढला. तर आमचे दोन लाख परत कर आणि तुझा भाऊ घेऊन जा, अशी बाबू चव्हाण यास फोनवरून धकमी दिली. याप्रकरणी अपहरण झालेल्या आबा चव्हाणच्या पत्नीने सोयगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
डोळा होता बाबूवर, सापडला आबा चव्हाण
अपहरणकर्त्यांनी मंगळवारी रात्रीपासून या भागात अपहरण नाट्याची फिल्डिंग लावली होती; परंतु मोठा भाऊ बाबू चव्हाणऐवजी शेतात जाताना त्याचा लहान भाऊ आबा चव्हाण हा बैलगाडी घेऊ जाताना मिळून आला. त्यामुळे अज्ञात सहा जणांनी त्याच्याकडे धाव घेऊन मारहाण करून अपहरण केल्याचे बोलले जात आहे. या घटनेने मात्र, परिसरात खळबळ उडाली आहे.