सल्ला धुडकावत बाईक पुरात घालणे जीवावर बेतले; खाम नदीत बुडून सुरक्षारक्षकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2021 12:40 PM2021-09-29T12:40:05+5:302021-09-29T12:41:05+5:30
पंढरपूरातील एका बॅटरीच्या गोदामात सुरक्षारक्षक म्हणून काम करणारे दीपक शेषराव कौसडीकर हे दुचाकीवरुन वळदगावमार्गे कांचनवाडीला जाण्यासाठी निघाले होते.
- शेख महेमूद
वाळूज महानगर ( औरंगाबाद ) : खाम नदीला पूर आला असून पुलावरून जाऊ नका असा नागरिकांनी दिलेला सल्ला धुडकावने एका सुरक्षारक्षकाच्या जिवावर बेतले आहे. रात्रपाळीची ड्युटी आटोपून कांचनवाडीला निघालेले सुरक्षारक्षक दीपक शेषराव कौसडीकर (५५) आज सकाळी (दि.२९) ८ वाजेच्या सुमारास पंढरपूर-वळदगावला जोडणाऱ्या खामनदीच्या पुलावरुन वाहून गेले. यावेळी प्रत्यक्षदर्शिनी नदीपात्रात उड्या घेऊन त्यांना वाचविण्याचे प्रयत्न व्यर्थ ठरले. काही अंतरावर त्यांचा मृतदेह आढळून आला.
या विषयी अधिक माहिती अशी की, दोन दिवसांपासून शहर व परिसरात जोरदार पावसामुळे खामनदी दुधडी भरुन वाहत आहेत. या पावसामुळे पंढरपूर-वळदगावला जोडणाऱ्या खामनदीच्या पुलावरुन दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने या दोन्ही गावाचा संपर्क तुटलेला आहे. पंढरपूरातील एका बॅटरीच्या गोदामात सुरक्षारक्षक म्हणून काम करणारे दीपक शेषराव कौसडीकर हे दुचाकीवरुन वळदगावमार्गे कांचनवाडीला जाण्यासाठी निघाले होते. यावेळी काही नागरिकांनी त्यांना पुरातून न जाण्याचा सल्ला दिला. मात्र, त्यांनी पुरातून बाईक घातली. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ते बाईकसह वाहून गेले. काही अंतरावर त्यांची बाईक खडकाला अडकली आणि ते पुढे वाहत गेले. हे दृष्य पाहताच गुलाब माळी व काही तरुणांनी नदीपात्रात उड्या घेऊन दीपक कौसडीकर यांना वाचविण्याचा प्रयत्न केला.मात्र, वेगवान प्रवाहामुळे त्यांचे प्रयत्न व्यर्थ ठरले.
याची माहिती मिळताच सरपंच अमर डांगर, उपसरपंच संजय झळके, माजी सरपंच कांतराव नवले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश नवले, पोलिस पाटील प्रकाश म्हस्के, तलाठी रघुनाथ शेळके, भगवान पवार, ग्रामविकास अधिकारी बळीराम राठोड, ग्रामपंचायत सदस्य विष्णु झळके आदींनी वाळूज अग्नीशमन व सातारा पोलिसांना याची माहिती दिली. दरम्यान, दीपक कौसडीकर यांचा मृतदेह एक किलोमीटर अंतरावर खामनदी पात्रात आढळून आला आहे.