लग्न होईना म्हणून आत्महत्येचा प्रयत्न
By Admin | Published: March 15, 2016 12:42 AM2016-03-15T00:42:44+5:302016-03-15T00:42:44+5:30
औरंगाबाद : सव्वादोन वर्षांपूर्वी ज्या मुलीशी साखरपुडा झाला तिच्याशी अद्यापपर्यंत लग्न न झाल्यामुळे आणि आता नातेवाईकांनी तिचा
औरंगाबाद : सव्वादोन वर्षांपूर्वी ज्या मुलीशी साखरपुडा झाला तिच्याशी अद्यापपर्यंत लग्न न झाल्यामुळे आणि आता नातेवाईकांनी तिचा दुसरीकडे पुन्हा साखरपुडा केल्यामुळे लग्नाची आशा मावळलेल्या एका भावी नवरदेवाने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे यांच्या कार्यालयात सोमवारी सकाळी ११ वाजता घडला. विष प्राशन केलेल्या तरुणावर घाटीत उपचार सुरू आहेत.
मनीषसिंग यमुनासिंग राजपूत (२८, मूळ रा. गोरखपूर, उत्तरप्रदेश, ह.मु. कोहिनूर पार्क, तीसगाव) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो गुत्तेदारीची कामे करतो. याबाबत क्रांतीचौक ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोवर्धन कोळेकर यांनी सांगितले की, मनीषसिंग याचा लासूर स्टेशन येथील विजयमाला (नाव बदललेले आहे) हिच्याशी १८ नोव्हेंबर २०१३ रोजी साखरपुडा झाला होता. दरम्यान, साखरपुड्यात दागिने करण्यासाठी आणि नंतर थोडे-थोडे करून विजयमालाच्या घरच्यांनी मनीषसिंग याच्याकडून २ लाख ४३ हजार रुपये घेतले. आता मात्र २ मार्च २०१६ रोजी विजयमालाच्या नातेवाईकांनी तिचा साखरपुडा दुसऱ्या तरुणाशी करून दिला. त्यामुळे पैसेही गेले आणि लग्नही होत नाही, असे समजून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर ३ मार्च रोजी मनीषसिंग याने स्पीड पोस्टाने शिल्लेगाव पोलिसांत तक्रार केली.
या तक्रारीनंतर पोलिसांनी कुठलीही कारवाई न केल्यामुळे आणि त्यालाही चौकशीला न बोलावल्यामुळे रागाच्या भरात त्याने सोमवारी सकाळी विष प्राशन केले. तक्रार अर्जासह तो थेट विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे यांच्या कार्यालयात आला. तेथील पोलीस कर्मचाऱ्यांशी संवाद साधत असतानाच त्याला चक्कर आली. तो जमिनीवर पडल्यावर त्याने विष प्राशन केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी त्याला रिक्षातून तात्काळ घाटीत दाखल केले.
दरम्यान, सहायक पोलीस निरीक्षक सुनीता मिसाळ यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. याबाबत क्रांतीचौक ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मनीषसिंग याने केलेली तक्रार १० मार्च रोजी प्राप्त झाली आहे. सोमवारी त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले. त्यावरून संबंधित मुलीच्या नातेवाईकांचा जबाब घेण्यात आला असून, मनीषसिंग याचा साखरपुडा झालेला नाही.
४संबंधित मुलीचे लग्न तुझ्याशीच लावून देऊ, असे सांगून मुलीच्या एका नातेवाईकाने त्याच्याकडून पैसे घेतले होते. मात्र, त्या नातेवाईक महिलेचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यानंतर इतरांना मनीषसिंग याने लग्नाबाबत विचारले तर त्यांनी स्पष्ट नकार दिला. त्यामुळे मनीषने हे कृत्य केल्याचे शिल्लेगाव ठाण्याचे सहायक निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी सांगितले.