सातारा परिसरात उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 18:38 IST2019-10-25T18:37:12+5:302019-10-25T18:38:42+5:30
उद्योजकाने कंपनीतच गळफास घेऊन आत्महत्या केली

सातारा परिसरात उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या
औरंगाबाद: सातारा परिसरात छोटा उद्योग चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणाऱ्या उद्योजकाने कंपनीतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २५ आॅक्टोबर रोजी दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास उघडकीस आली. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
घनश्याम मनोहरराव माहोरे (३९,रा. दर्शविहार, सातारा परिसर)असे मृताचे नाव आहे. सातारा पोलिसांनी सांगितले की, घनश्याम हे सातारा परिसरात लघू उद्योग चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित. आज शुक्रवार असल्याने त्यांची कंपनी बंद असते. असे असताना ते घराबाहेर पडले आणि कंपनीत गेले. यानंतर त्यांनी तेथील छताच्या पंख्याला बेडशीटच्या सहाय्याने गळफास घेतला. बराचवेळा फोन केल्यानतंरही घनश्याम हे फोन उचलत नसल्याने दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास त्यांचा भाऊ किशोर माहोरे हे त्यांना शोधत कंपनीत गेले. तेव्हा त्यांना घनश्याम यांनी गळफास घेतल्याचे दिसले. त्यांना बेशुद्धावस्थेत उतरवून घाटीत दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी घनश्याम यांना तपासून मृत घोषित केले. याविषयी सातारा ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सहायक पोलीस उपनिरीक्षक सुभाष भोसले हे या तपास करीत आहेत. घनश्याम यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.