जीएसटी भरण्यासाठी पैसे नाहीत; लघू उद्योजकाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 01:54 AM2019-11-20T01:54:05+5:302019-11-20T06:23:26+5:30
जीएसटी भरणा थकला; कामाचे पैसे मिळत नसल्याने संपविले जीवन
औरंगाबाद : थकलेला जीएसटी भरणा करण्यासाठी पैसे नाहीत, तसेच मोठ्या कारखान्यांकडून संबंधित कामाचे पैसेही मिळत नसल्याने आर्थिक अडचणीत सापडलेले लघुउद्योजक विष्णू रामभाऊ काळवणे (५३) यांनी मंगळवारी सिडको वाळूज महानगरातील साक्षीनगरात राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले.
काळवणे हे मूळचे फुलशेवरा (ता. गंगापूर) येथील रहिवासी असून, अनेक वर्षांपासून ते पंढरपुरात कुटुंबासह वास्तव्यास आहेत. चार-पाच महिन्यांपूर्वी काळवणे यांनी सिडको वाळूज महानगरातील साक्षीनगरात भाड्याने घर घेऊन दोघे पती-पत्नी अधूनमधून येथे राहत होते. काळवणे यांच्या मागे पत्नी शांताबाई, मुलगा राहुल, सून असून दोन्ही मुलींचे लग्न झालेले आहे.
काळवणे यांनी काही वर्षांपूर्वी वाळूज एमआयडीसीतील डब्ल्यू-५२ सेक्टरमध्ये गणेश इंडस्ट्रिज नावाने उद्योग सुरू केला होता. त्यात ८ ते १० कामगार आहेत. कारखान्यांच्या स्पेअर पार्टसला बफिंग (पॉलिश) करण्याचे काम ते करीत होते. मात्र संबंधित कामाचे पैसे त्यांना वेळेवर पैसे मिळत नव्हते; परंतु कामगारांना पगार वेळेत द्यावा लागत असल्यामुळे काळवणे गेल्या काही दिवसांपासून तणावात होते. सहा महिन्यांपासून त्यांचा जीएसटीचा भरणा थकला होता. तो भरणा करण्यासाठी त्यांना मानसिक त्रास दिला जात होता. या ताण-तणावातून विष्णू काळवणे यांनी तीन-चार दिवसांपासून शेडमधील काम बंद केले होते, असे समजते.
चिठ्ठीतील मजकूर
मी विष्णू काळवणे असे लिहून ठेवतो, हे सगळे सत्य आहे. माझ्याकडे कंपनीचे भुगतान, जीएसटीचे ७ महिन्यांचे थकले. कारण मला ६ महिन्यांपासून याचे काम परवडत नव्हते. यावरून या लोकांनी ६ महिन्यांपासून मुद्दामहून त्रास दिला. मी कीर्ती साहेबाला वारंवार भेटण्याचा प्रयत्न केला. ते भेटत नसे, समजून सांगण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याने कधीच ऐकून घेतले नाही. माझ्या काय समस्या होत्या, ऐकल्या नाही. मी दररोज फोन करायचो, फोन उचलला नाही. याने मला ६ वर्षांत भाव वाढवून दिला नाही. मी जीएसटी भरायला तयार होतो, तरी पेमेंट दिले नाही. मानसिक त्रास दिल्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागला. मला ७ महिने खूप त्रास सहन करावा लागला. माझ्यासोबत हे घडले, कुणासोबत घडू नये. कीर्ती साहेबांनी माझे ऐकले असते तर मी वाचलो असतो.
पुण्यातील मुलीला व्हॉट्सअॅपवर चिठ्ठी पाठवून केली आत्महत्या
काळवणे यांची मुलगी रोशनी जाधव ही पुण्यास वास्तव्यास आहे. मंगळवारी सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी तिच्या व्हॉटस् अॅप नंबरवर त्यांनी एक हस्तलिखित चिठ्ठी पाठविली होती. त्यात काळवणे यांनी जीएसटीचा ७ महिन्यांचा परतावा थकल्याने, तसेच कीर्ती साहेबांकडून पैसे मिळत नसल्यामुळे आत्महत्या करीत असल्याचा मजकूर पाठविला होता. चिठ्ठी वाचल्यानंतर रोशनी हिने तात्काळ आई शांताबाई व भाऊ राहुल यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. ही माहिती मिळताच नातेवाईकांनी तात्काळ साक्षीनगरात जाऊन पाहणी केली असता विष्णू काळवणे घरात साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. नातेवाईकांनी काळवणे यांना बेशुद्ध अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.स्र