वाळूजमध्ये कंत्राटी कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 06:46 PM2021-03-20T18:46:01+5:302021-03-20T18:47:22+5:30
कार्तिक बाबासाहेब गंडे हा वाळूज एमआयडीसील एका कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून काम करत असे.
वाळूज महानगर : एका अठरा वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज शनिवार (दि.२०) दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास वाळूजला उघडकीस आली आहे. कार्तिक बाबासाहेब गंडे (रा.मनिषानगर, वाळूज) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की, कार्तिक बाबासाहेब गंडे हा वाळूज एमआयडीसील एका कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून काम करतो. आज शनिवारी आई-वडील घरी नसताना कार्तिक याने घराचा दरवाजा आतून लावला होता. दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास कार्तिक याचे वडील बाबासाहेब गंडे हे घरी आले असता त्यांना दरवाजा आतुन बंद असलेल्या दिसून आला. यानंतर बाबासाहेब गंडे यांनी जोर-जोरात दरवाजा ठोठावत कार्तिक यास हाका मारल्या. मात्र आतुन कुठलाही प्रतिसाद येत नसल्याने बाबासाहेब गंडे यांनी खिडकीतुन घरात बघितले असता त्यांना कार्तिक हा छताच्या पंख्याला गळफास घेतलेल्या आवस्थेत दिसून आला.
या प्रकारामुळे घाबरलेल्या बाबासाहेब गंडे यांनी मदतीसाठी आरडा-ओरडा केला असता शेजारी नागरिक व पोलिसांनी घटनास्थळ गाठुन कार्तिक याचा गळफास काढुन त्यास खाली उतरविले. यानंतर कार्तिक यास बेशुद्ध आवस्थेत पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यास मयत घोषीत केली. यावेळी सहायक उपनिरीक्षक शेख सलीम यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून कार्तिक याच्या आत्महत्येचे कारण समजु शकले नाही.