दोन महिन्यांच्या बाळाला सोडून विवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:06 AM2021-03-18T04:06:01+5:302021-03-18T04:06:01+5:30
पाचोड : दोन महिन्यांच्या तान्हुल्याला सोडून एका २७ वर्षीय विवाहितेने माहेरी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना ...
पाचोड : दोन महिन्यांच्या तान्हुल्याला सोडून एका २७ वर्षीय विवाहितेने माहेरी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना पाचोड येथे बुधवारी सकाळी ९ वाजेदरम्यान घडली. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरकडील पती, सासू, दीर व नणंद यांच्याविरोधात पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाचोड येथील प्रकाश भुमरे यांची मुलगी प्रणाली हिचा विवाह गेवराई (जि. बीड) येथील दत्तात्रय गोडबोले या बँक शाखा व्यवस्थापकासोबत सहा वर्षांपूर्वी झाला होता. लग्नात भुमरे यांनी साडेसात लाख रुपये हुंडा दिला होता. प्रणाली हिच्या हातावर थोडा पांढरा डाग दिसत असल्याने सासरकडील मंडळी तिला शारीरिक व मानसिक त्रास देत होते. तसेच घर घेण्यासाठी माहेराहून पैसे आणण्याची मागणी करीत होते. तेव्हा भुमरे यांनी सव्वा लाख रुपये जावयाला दिले. त्यानंतरही तिला त्रास देणे थांबले नाही. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात पतीने प्रणाली हिला पाचोड बसस्थानक येथे आणून सोडले होते. आपल्याला होत असलेल्या त्रासाबाबत प्रणाली हिने वारंवार आई-वडिलांना सांगितले होते. यानंतर प्रणाली बाळंतपणासाठी तीन महिन्यांपूर्वी माहेरी आली होती. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मुलगी झाली म्हणूनही सासरकडील मंडळी नाराज होते. त्यामुळे ते कोणीही भेटायला आले नाहीत. यामुळे प्रणाली तणावात होती. फोनवरून पती-पत्नीत वाद होत होता. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत नवरा-बायको दोघेही फोनवर बोलले. यानंतर बुधवारी सकाळी आई गच्चीवर गेली व वडील लहान बाळाला घेऊन समोरील रूममध्ये बसले होते. तेव्हा प्रणालीने खाेलीचे दार बंद करून घरातच साडीने गळफास घेतला. ही बाब समजल्यानंतर प्रकाश भुमरे यांनी आरडाओरडा केला. नातेवाईकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोउनि. सुरेश माळी, जमादार सुधाकरराव मोहिते, पोह. पवन चव्हाण यांनी धाव घेत प्रणाली हीस ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. मयत प्रणालीवर माहेरीच अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी प्रकाश भुमरे यांच्या फिर्यादीवरून दत्तात्रय गोडबोले (पती), सरोजा गोडबोले (सासू), विकास गोडबोले (दीर) व सुवर्णा वैद्य (नणंद) यांच्या विरोधात पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौकट
माहिती देऊनही पती पोहोचला पाच तासांनंतर
प्रणालीने आत्महत्या केल्याची माहिती सासरकडील मंडळींना देण्यात आली होती; मात्र तिकडून कोणीही आले नाही. शेवटी दोन वाजता पाच तासांनंतर पती ग्रामीण रुग्णालयात आला.