ऑनलाईन गेममध्ये ५० हजार गमावलेल्या युवकाची आत्महत्या
By राम शिनगारे | Published: May 5, 2023 09:22 PM2023-05-05T21:22:34+5:302023-05-05T21:22:47+5:30
हर्सुल तलावामध्ये घेतली उडी : अग्नीशमन विभागाच्या पथकाने काढले बाहेर
छत्रपती संभाजीनगर : ऑनलाईन गेममध्ये ५० हजार रुपये गमावल्यामुळे तणावात असलेल्या युवकाने हर्सुल तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आला आहे. या प्रकरणी हर्सुल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केल्याची माहिती निरीक्षक अमोल देवकर यांनी दिली.
गौरव चंद्रकांत पवार (२३, रा.पवननगर, टी.व्ही. सेंटर) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. गौरवने मेकॅनिकल डिप्लोमा पूर्ण केला होता. त्याचे वडील शेती करतात. आई गृहिणी आहे. सध्या तो एका खाजगी कंपनीत काम करीत होता. गौरव हा एकुलता एक मुलगा असून, त्याच्या दोन बहिणीचे लग्न झालेले आहे. गौरवला काही दिवसांपासून ऑनलाईन गेम खेळण्याची सवय लागली होती. त्यामध्ये त्याने ५० हजार रुपये गमावले.
ही माहिती नातेवाईकांना झाल्यानंतर गमावलेले पैसे भरण्यासाठी मामाने त्याला ४० हजार रुपये दिले होते. तरीही तो तणावातच होता. शुक्रवारी सकाळी घरी वडिलांसोबत त्याने जेवण केले. आई-वडिलांना कामानिमित्त बीडला गेले. घरात एकटाच असल्यामुळे गौरव दुपारच्या वेळी हर्सुल तलाव परिसरात आला. तलावाच्या काठावर खूप वेळ बसून होता. काही वेळाने त्याने तलावात उडी घेतली. ही बाब सुरक्षारक्षक राजेश गवळे यांच्या लक्षात आली. त्यांनी हर्सुल पोलिसांसह अग्नीशमन विभागाला माहिती कळवली.
त्यानुसार अग्नीशमन विभागाचे अधिकारी आर.के. सुरे, अब्दुल अजीज, संजय कुलकर्णी, हारीभाऊ घुगे, जवान सोमिनाथ भोसले, अशोक वेलदोडे, शुभम कल्याणकर, संदीप मुगशे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत गौरवला तलावातुन शोधुन काढले. त्यास घाटी रुग्णालयात बेशुद्ध अवस्थेत दाखल केले. त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास सहायक फाैजदार एस.आर.वाघ करीत आहेत.