सात महिन्यांच्या गर्भवती प्राध्यापिकेची आत्महत्या, १० वर्षांपूर्वी झाला होता प्रेमविवाह
By योगेश पायघन | Published: February 4, 2023 01:16 PM2023-02-04T13:16:56+5:302023-02-04T13:17:46+5:30
सासरच्या जाचाला कंटाळून गळफास; नातेवाईकांचा आरोप
औरंगाबाद : गारखेडा परीसरातील ३० वर्षीय उच्च शिक्षित अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापिकेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. वर्षा दीपक नागलोत (३० रा. प्लाॅट नं ७८-७८, गजानन काॅलनी, कन्या शाळेच्या बाजुला गारखेडा परीसर) असे मयत विवाहितेचे नाव आहे. त्या सात महिन्यांच्या गरोदर होत्या.
पोलिसांनी दिलेल्या माहिनीनुसार, शासकीय तंत्रनिकेतनमध्ये शिकत असतांना २०१२ मध्ये वर्षा यांची नातेवाईक असलेल्या दीपक नागलोत यांच्याशी ओळख झाली. त्यातून प्रेम जुळल्यावर त्यांनी प्रेमविवाह केला. दीपक खाजगी कंत्राटदार असून या दांपत्याला ८ वर्षांचा मुलगा दुसरीत शिकत आहे. तर वर्षा सात महिन्यांच्या गरोदर होत्या. ईलेक्ट्राॅनिक्स ॲण्ड टेलि कम्युनिकेशनमध्ये एमई करून सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत वर्षा शुक्रवारी एमआयटी महाविद्यालयातून ड्युटीवरून परतल्या. त्यानंतर बेडरूमध्ये पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे सायंकाळी ६.२० वाजता समोर आले. त्यांना पती दीपकसह सासरकडील मंडळींनी घाटी रुग्णालयात दाखल केले असता डाॅक्टरांनी मयत घोषीत केले. त्यावेळी आणलेली कार अपघात विभागासमोर सोडून ते निघून गेले. असे नातेवाईकांनी सांगितले. ही कार शनिवारी सकाळपर्यंत घाटी रुग्णालयाच्या अपघात विभागासमोर उभी होती.
सासरच्या जाचाला कंटाळून गळफास; नातेवाईकांचा आरोप
१० वर्षांपुर्वी प्रेमविवाह केलेल्या वर्षा यांना गेल्या वर्षांपासून सासरचा जाच होता. मात्र, प्रेमविवाह असल्याने त्या माहेरी काही सांगत नव्हत्या. गुरूवारी काही तरी वाद घरात झाला होता. त्यावेळी वर्षा यांच्या सासुने वडील शांतिलाल जारवाल (रा. सजरपुरवाडी, ता. वैजापुर) यांना फोन करून वर्षाने काही सांगितले का अशी विचारणा केली होती. सासरच्या जाचाला कंटाळून वर्षाने आत्महत्या केल्याचा आरोप मयत वर्षा यांच्या वडिलांनी केला आहे. या प्रकरणाची नोंद पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक संदीप काळे, करित आहे.