सुसाट चोरटे अन् मुकाट पोलीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 11:25 PM2019-02-04T23:25:35+5:302019-02-04T23:26:06+5:30
दुष्काळाच्या झळा अद्याप शहरापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. परंतु वाढत्या गुन्हेगारीने शहरवासीयांची चिंता वाढविली आहे. समर्थनगरात सोमवारी भरदुपारी झालेल्या घरफोडीने चोरटे, घरफोड्यांची दहशत वाढलेली असून ‘सुसाट चोरटे व मुकाट पोलीस’ अशी केविलवाणी परिस्थिती निर्माण झाली आहे.
औरंगाबाद : दुष्काळाच्या झळा अद्याप शहरापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. परंतु वाढत्या गुन्हेगारीने शहरवासीयांची चिंता वाढविली आहे. समर्थनगरात सोमवारी भरदुपारी झालेल्या घरफोडीने चोरटे, घरफोड्यांची दहशत वाढलेली असून ‘सुसाट चोरटे व मुकाट पोलीस’ अशी केविलवाणी परिस्थिती निर्माण झाली आहे.
व्यंकटेश अपार्टमेंटमधील एक सदनिका फोडून चोरट्यांनी अर्धा किलो सोने व एक लाख रुपये पळविले. वर्दळीच्या रस्त्यावर आणि क्रांतीचौक ठाण्यापासून अगदी दोन मिनिटाच्या पायी अंतरावर ही सदनिका आहे. चोरट्यांनी ती लीलया फोडून एका कुटुंबाची जीवनपुंजी पळविली. यातून दिसते ते निर्ढावलेल्या चोरट्यांचे वाढलेले धाडस. पोलिसांच्या सुस्तावलेल्या कार्यशैलीला ही फळे येताहेत. १५ लाखांहून अधिक लोकसंख्येच्या या शहरात अशी घटना होणे स्वाभाविक आहे, असा दावा होऊ शकतो; परंतु गेल्या महिनाभरात वाढलेल्या गंभीर गुन्ह्यांची संख्या व प्रकार पाहून सर्वसामान्यांना हतबल होण्याची वेळ येऊ घातली आहे.
मंगल कार्यालयातून लाखो रुपयांचे दागिने पळविणाऱ्या घटना एकापाठोपाठ एक गेल्या महिन्यात घडल्या. त्या टोळ्या जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले नाही. किमानपक्षी पोलीस सतर्क झाल्याचे लक्षात आल्यानंतर या चोºया थांबल्या. अर्थातच पोलीस बेसावध आहेत, हे हेरून चोरटे हात साफ करतात. हा नेहमीचाच परिपाठ. त्यात सोमवारी पौष अमावास्या होती. अमावास्येनिमित्त चोरटे अधिक मोकळेपणाने बाहेर पडतात. अमावास्येला गुन्हे अधिक घडतात, हे पोलिसांना परंपरेने सांगितलेले उघड गुपित आहे. त्यामुळे पोलीस अमावास्येच्या रात्री शहराची नाकेबंदी करतात. दिवसा मात्र पोलीस काहीच करीत नाहीत. पोलिसांची ही रीत ओळखून मग चोरट्यांनी भरदिवसा समर्थनगरातील घर फोडले तर नसावे? असो.
प्रत्येक पोलीस आयुक्तांचा प्रशासन हाकण्याचा एक वकूब व हातोटी असते. तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या चार्लीने पोलिसांचे रस्त्यावर सतत वास्तव्य असल्याने दरारा निर्माण झाला होता. प्रशासनावर त्यांची कमांड होती, तसेच नागरिकांत त्यांनी एक आत्मविश्वासही निर्माण केला होता. यशस्वी यादवांनी ‘आॅपरेशन आॅल आॅऊट’ सारखी मोहीम शहरात राबविली. पोलीस यंत्रणा अचानक रस्त्यावर उतरून तपास मोहीम हाती घ्यायची. या मोहिमेचा चोरट्यांनी धसका घेतला होता. विद्यमान आयुक्तांनी कम्युनिटी पोलिसिंगवर भर दिला आहे. ते कामगार वसाहती, झोपडपट्ट्यामधून युवक-युवतींना तंत्र-कौशल्य देऊन त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी झटत आहेत.
यातून शहरातील गुन्हेगारीवरील नियंत्रण काहीसे सैल झाले असावे. शहरात होणाºया दिवस-रात्रीच्या गस्तीही प्रचंड प्रभावित झालेल्या दिसत आहेत. अनेक पोलीस निरीक्षक खासगीत बोलताना या कामाविषयी नाराजी व्यक्त करतात. पाच दिवसांपूर्वी छाजेड कुटुंबावर झालेला निर्घृण हल्ला, मुकुंदवाडीतील परवा रात्रीची दंगलसदृश स्थिती हे संपलेल्या पोलीस गस्तीची उदाहरणे होत. या परिसरातील रहिवाशांनीही यावरच बोट ठेवले आहे. कम्युनिटी पोलिसिंग करताना गुन्हेगारी वाढून सर्वसामान्यांना त्रास होणार असेल, तर कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याचेच हे निदर्शक म्हणावे.
थंडीचा कडाका कमी होत असताना आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. उन्हाच्या सोबतीला दुष्काळही येणार आहे. त्यामुळे परिस्थिती कशी वळण घेईल, हे काळच ठरवील. त्यासाठी पोलिसांनी आता गुन्हेगारांवर वचक ठेवून गुन्हेगारी नियंत्रणात आणणे आवश्यक आहे.