सोयगावात आर्थिक विवंचनेतून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 12:46 PM2020-12-05T12:46:45+5:302020-12-05T12:49:20+5:30
अतिवृष्टीने शेतातील सर्व पिक वाया गेले.
सोयगाव : अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, शेतीसाठी झालेला खर्च आणि डोक्यावर कर्जाचा भार यामुळे आर्थिक विवंचनेत असलेल्या एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी किन्ही येथे उघडकीस आली. विजेंद्र (उर्फ सोनू ) सुरेश देशमुख (३०) असे मुराताचे नाव असून शेतीत उत्पन्नच नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह पुढे कसा चालवायचा या चिंतेत त्याने आत्महत्या केल्याची माहिती आहे.
तालुक्यातील किन्ही येथील लताबाई सुरेश देशमुख यांची गट नं.३५ मध्ये दोन एकर शेती आहे. त्यांना दोन मुले आहेत. यातील विजेंद्र हा घरातील कर्ता पुरूष होता. त्याने या वर्षी कपाशी व आरबी पिकांची शेतात लागवड केली होती. परंतु, अतिवृष्टीने शेतातील सर्व पिक वाया गेले. लागवड केलेला खर्च सुद्धा निघाला नाही, तसेच कर्जमाफीमध्ये नावही आले नाही. यातच आईचे आजरपण, शेतीसाठी लागलेला पैसा, डोक्यावर कर्जाचा बोजा यातून उदरनिर्वाह कसा चालेल या विवंचनेत ते होते.
शनिवारी सकाळी विजेंद्र शेतात गुरांना घेऊन गेला. येथेच त्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. यानंतर शेजारील शेतकरी प्रविण जैन तेथे आले आता त्यांना विजेंद्र अत्यवस्थ अवस्थेत आढळून आला. त्यांनी तात्काळ विजेंद्रच्या नातेवाईकांना सोबत घेऊन बनोटी येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले. येथे डॉक्टरांनी तपासून विजेंद्र मृत झाल्याचे सांगितले. वैद्यकीय अधिकारी कृष्णा घावटे यांनी उत्तरीय तपासणी केली. पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.