धक्कादायक ! लग्नाच्या चार दिवस अगोदरच तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 04:14 PM2020-06-26T16:14:07+5:302020-06-26T16:14:33+5:30
जळगाव जिल्ह्यातील गावी २९ जून रोजी ५० लोकांच्या उपस्थितीत होणार होता विवाह
औरंगाबाद : लग्न अवघ्या चार दिवसांवर आलेले असताना तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी मित्रनगर येथे घडली. तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
स्रेहल दिलीप चौधरी (२५), असे मृत तरुणीचे नाव आहे. लॉकडाऊनमुळे स्रेहलचा लग्न समारंभ पुढे ढकलण्यात आला होता. कोरोनाचा कहर वाढतच असल्याचे पाहून २९ जून रोजी ५० लोकांच्या उपस्थित लग्न लावण्याचा निर्णय वधू-वराकडील मंडळीने घेतला होता. लग्न जळगाव जिल्ह्यातील गावी होणार असल्याने तिचे आई-वडील, लहान बहीण आणि स्रेहल हे गावी जाणार होते. दरम्यान, गुरुवारी सकाळी ७ वाजता तिचे वडील एमआयडीसीमध्ये कामावर गेले होते. यानंतर ८ वाजेच्या सुमारास स्रेहल झोपेतून उठली तेव्हा तिची आई स्वच्छतागृहात गेली होती. लहान बहीण झोपलेली होती.
यावेळी स्रेहल स्वयंपाक घरात गेली आणि आतून दार लावून घेतले. स्वच्छतागृहातून बाहेर आल्यानंतर तिच्या आईने घरातील इतर कामे केली. बराच वेळ झाला तरी स्रेहल किचनमधून बाहेर न आल्याने त्यांनी दार ठोठावले. मात्र, आतून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी स्रेहलच्या लहान बहिणीला झोपेतून उठवले. घरमालकांना बोलावण्यात आले. सर्वांनी दार ठोठावल्यानंतरही स्रेहलने दार उघडले नाही. यामुळे तिच्या वडिलांना आणि जवाहरनगर पोलिसांना बोलाविण्यात आले. पोलिसांनी दार तोडून पाहिले असता स्रेहलने ओढणीने पंख्याला गळफास घेतल्याचे त्यांच्या नजरेस पडले. यानंतर तिला घाटीत दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिला तपासून मयत घोषित केले. याविषयी जवाहरनगर ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद पोलिसांनी घेतली.
स्रेहल होती औषध निर्माणशास्त्रात पदवीधर
स्रेहल बालपणापासूनच हुशार होती. औषधनिर्माणशास्त्रात तिने (बी. फार्मसी) पदवी प्राप्त केली होती. शिवाय ती नोकरीच्या शोधात होती. कदाचित तिला हे लग्न मान्य नसावे यामुळेच तिने मृत्यूला कवटाळले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.