बिबट्याच्या मृत्यूबाबत स्युमोटो याचिका : ‘लोकमत’मधील वृत्ताची खंडपीठाने स्वत:हून घेतली दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 06:44 PM2020-04-16T18:44:43+5:302020-04-16T18:47:47+5:30
बेशुद्ध केल्यानंतर बिबट्याचा झाला होता मृत्यू
बुधवारी खंडपीठात झालेल्या तातडीच्या प्रकरणांवर सुनावणीदरम्यान खंडपीठाने स्वत:हून लोकमतच्या या वृत्ताची दखल घेऊन या वृत्ताला स्युमोटो जनहित याचिका म्हणून दाखल करून घेतले. न्यायालयाचे मित्र अमिकस क्युरी म्हणून अॅड. चैतन्य धारूरकर यांची खंडपीठाने नेमणूक केली अॅड. धारूरकर यांनी २७ एप्रिल पूर्वी जनहित याचिका तयार करून खंडपीठात सादर करावी यासाठी त्यांनी ही बातमी लिहिणारे लोकमतचे वार्ताहर यांचे सहकार्य घ्यावे, असेही आदेशात म्हटले आहे.
औरंगाबाद येथे महापालिकेचे प्राणिसंग्रहालय आणि शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालय आहे त्यांच्याकडील पशुवैद्यकीय डॉक्टरांचे बिबट्याच्यामृत्यूच्या कारणाबाबत माहिती घेण्यासाठी सहकार्य घेता येईल म्हणून त्यांना प्रतिवादी करण्याची मुभा खंडपीठाने अॅड. धारूरकर यांना दिली आहे. खंडपीठाने महापालिकेच्या आयुक्तांना निर्देश दिले आहे. की, त्यांनी बिबट्याच्या मृत्यूसंदर्भातील सर्व कागदपत्रे, छायाचित्रे आणि पोस्टमार्टेम रिपोर्ट आदी कागदपत्रे मुख्य वनसंरक्षक प्रकाश महाजन यांच्याकडून त्वरित ताब्यात घ्यावीत. त्याचे दोन संच तयार करून १६ एप्रिलच्या दुपारी तीन वाजेपर्यंत उच्च न्यायालयाच्या प्रबंधकांकडे बंद पाकिटात दाखल करावेत. हे पाकीट महापालिकेने नियुक्त केलेल्या अधिका-यांमार्फत पाठवावे. प्रबंधकांनी त्या अधिका-याच्या उपस्थितीत बंद पाकीट उघडून त्यातील दोन संचांची मूळ संचासोबत पडताळणी करावी. रात्रीनंतर प्रबंधकांनी संबंधित अधिकाऱ्यांमार्फत बंद पाकिटात मूळ संच मनपा आयुक्तांना परत करावा. त्यातील एक संच त्यांनी अॅड. धारूरकर यांना जनहित याचिका तयार करण्यासाठी द्यावा व दुसरा जतन करून ठेवावा.
महापालिकेतर्फे वडगाव येथील प्रस्तावित प्राण्यांच्या स्मशानभूमीबाबत अॅड. धारूरकर यांना माहिती द्यावी, असे आदेशात म्हटले आहे. महापालिकेतर्फे अॅड. संतोष चपळगावकर तर शासनातर्फे मुख्य सरकारी वकील डी. आर. काळे काम पाहत आहेत.