‘सुमित’ साठी तब्बल नऊ लाख रु. जमा!
By Admin | Published: September 29, 2014 01:03 AM2014-09-29T01:03:26+5:302014-09-30T01:30:09+5:30
औरंगाबाद : स. भु. विद्यामंदिरात इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या सुमित सरदेशपांडे या विद्यार्थ्याचा शाळेतच अचानक ब्रेन हॅमरेज झाला.
औरंगाबाद : स. भु. विद्यामंदिरात इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या सुमित सरदेशपांडे या विद्यार्थ्याचा शाळेतच अचानक ब्रेन हॅमरेज झाला. शिक्षकांनी वेळीच त्याला दवाखान्यात दाखल केल्याने पुढील संकट टळले. सुमितवर औषधोपचार करण्यासाठी डॉक्टरांनी तब्बल १२ लाख ७० हजार रुपयांचा खर्च सांगितल्याने त्याच्या कुटुंबियांच्या पायाखालची वाळूच घसरली. ‘लोकमत’ने सुमितच्या औषधोपचारासाठी दानशूर मंडळींना एकदा नव्हे दोनदा नव्हे तर तीनदा आवाहन केले. त्यामुळे आजपर्यंत नऊ लाख रुपये जमा झाले आहेत.
‘लोकमत’ने पुढाकार घेतला नसता तर आज एवढी मोठी रक्कम जमा झालीच नसती; आपल्या मुलाचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांचा जेवढा वाटा आहे, तेवढाच लोकमतचा असल्याचे सुमितचे वडील सुशील सरदेशपांडे यांनी सांगितले. ‘लोकमत’ने १७ सप्टेंबर रोजी सर्वप्रथम ‘पैशाअभावी कामगाराच्या मुलाची मृत्यूशी झुंज’या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. हे वृत्त प्रसिद्ध होताच सिग्मा हॉस्पिटल येथे दानशूर मंडळींनी मदतीसाठी अक्षरश: रांग लावली. त्यानंतर स.भु. शिक्षण संस्थेने सर्वात मोठी २ लाख ७३ हजार रुपयांची मदत केली. देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय, स्वामी विवेकानंद अकॅडमी, बोर्डे कोचिंग क्लासेस, स. भु. महाविद्यालय, गायत्री मेडिकलतर्फे १ लाख, अशी अनेक ठिकाणी वर्गणी जमा करण्यात आली.
सरदेशपांडे कुटुंबीय बीड बायपासवर अरुणोदय कॉलनीत राहतात. कॉलनीतील नागरिकांनी सुमित आपलाच मुलगा आहे, त्याच्या आयुष्याची दोर आणखी मजबूत झाली पाहिजे, अशी प्रेरणा घेऊन नागरिकांनी मोठी वर्गणी जमा केली.
सुमित सरदेशपांडेच्या डोक्यात पुन्हा भविष्यात रक्तस्राव होऊ नये म्हणून काही औषधोपचार आणि शस्त्रक्रिया करायच्या आहेत. दोन दिवसांपूर्वीच त्याच्या डोक्यात अचानकपणे दुखत असल्याने त्याला सिग्मा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उद्या सोमवारी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. युरोप येथून मागविण्यात आलेले औषध त्याच्या शरीरात सोडण्यात येणार आहे.
शहरातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच माझ्यासाठी पुढाकार घेतला. त्यांचे ऋण माझे कुटुंब कधीच फेडू शकणार नाही, असेही सुशील सरदेशपांडे यांनी नमूद केले. आज जे संकट आमच्या कुटुंबावर कोसळले आहे, असे संकट कोणावरही येऊ नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना असल्याचे त्यांनी नमूद केले. आभार व्यक्त करताना सुशील सरदेशपांडे यांचा कंठही दाटून आला होता.