उन्हाळा वाढला, फळे स्वस्त; पण आरोग्यासाठी काय खायला हवे ?
By प्रशांत तेलवाडकर | Updated: March 27, 2024 18:59 IST2024-03-27T18:59:30+5:302024-03-27T18:59:51+5:30
फळांचे दर स्थिर : आरोग्य- खिशालाही फायदेशीर

उन्हाळा वाढला, फळे स्वस्त; पण आरोग्यासाठी काय खायला हवे ?
छत्रपती संभाजीनगर : दिवसेंदिवस तापमान वाढत आहे. दुपारच्या वेळी तर उन्हाचा चटका जाणवत आहे. अशावेळी शरीराला थंड ठेवण्यासाठी व ऊर्जा निर्माण करण्यासाठी रसाळ फळांचा वापर वाढला आहे. त्यात सध्या रमजान महिना सुरू आहे. रोजा (उपवास) सोडण्यासाठी फळांचे सेवन केले जात आहे. फळे स्वस्त असल्याने सर्वसामान्य जनताही ’दिल खोल के’ फळे खरेदी करीत आहेत.
तापमान ३८.८ अंशांवर
दररोज तापमानात वाढ होत आहे. शनिवारी ३८.६ अंश तापमान नोंदवले गेले. येत्या आठवड्यात तापमान ४० अंशांवर जाऊन पोहोचेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
उन्हाळ्यात कोणती फळे खायला हवी?
१) टरबूज : टरबूजमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त पाणी असते. यात फायटोकेमिकल्स आणि व्हिटॅमिन सी देखील असते. टरबूज खाल्लास घामामुळे गमावलेली जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळण्यास मदत होते.
२) आंबा : आंब्यामध्ये ८२ टक्क्यांपर्यंत पाणी असते. ते ॲन्टिऑक्सिडंट्सने भरलेले असते. आंबा खाल्ल्याने शरिरातील कोलेस्टेरॉलची पातळीही कमी होते आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारते.
३) संत्रा : संत्र्यामध्ये ८२ टक्के पाणी असते. हृदयाचे कार्य सुधारणे. शरीरातील एलडीएल कोलेस्टेरॉलची पातळी कमी करणे आणि पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन सी प्रदान यासारखे अनेक फायदे संत्रा सेवनाने होतात.
४) किवी : किवीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी ६, व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम, लोह आणि मॅग्नेशियम यासाखरी खनिजे असतात. पचनशक्ती सुधारण्यासाठी किवी सेवन केले पाहिजे.
फळांचे दर काय?
फळांचा प्रकार दर (प्रतिकिलो)
१) टरबूज : २० ते २५ रुपये
२) आंबे : १०० ते १५० रुपये
३) चिकू : ५० ते ६०रुपये
४) संत्री : ४० ते ५०रुपये
५) खरबूज : ४० ते४५ रुपये
६) पपई : ५० रुपये
७) किवी : १०० रुपये (३ नग)
शहागंजमध्ये दररोज १० टन फळांची विक्री
फळांची मोठी बाजारपेठ शहागंज परिसर बनला आहे. रमजान महिना व उन्हाळ्याचे दिवस यामुळे येथे दररोज १० टन फळांची विक्री होते. रसाळ फळे रोजा (उपवास) सोडण्यासाठी सर्वाेत्तम आहेत. यामुळे फळांची मोठी विक्री होत आहे.
- जुनेद खान, फळ वितरक