उन्हाचा ‘शाॅक’! छत्रपती संभाजीनगरात पारा ४१.६ अंशांवर गेल्याने विजेची मागणी वाढली
By साहेबराव हिवराळे | Published: May 9, 2024 05:56 PM2024-05-09T17:56:00+5:302024-05-09T17:57:11+5:30
वीजपुरवठा अद्यापही पूर्णत: सुरळीत झाला नाही
छत्रपती संभाजीनगर : शहराचा पारा ४१.६ अंशांपर्यंत पोहोचला असल्याने कूलर तसेच एसीचा लोड वाढल्याने विजेच्या फीडरवर परिणाम होत आहे. त्यातच गेल्या आठवड्यात सोसाट्याचा वारा अन् पावसाने महावितरणला चांगलाच फटका दिला. हा दुरुस्तीचा खर्च दोन कोटींपर्यंत गेला आहे.
उन्हाचा पारा सातत्याने ४० अंशांच्या पुढे जात असल्याने विजेची मागणी वाढलेली दिसली. सध्या शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या असल्याने दिवसभर टीव्हीपुढे बसून कार्टून, मालिका तसेच व्हिडीओ गेमकडे मुलांचा कल आहे. त्यातच वीज दिवसभरातून अनेकदा गायब होत असल्याने अनेक कुटुंबे सौर ऊर्जेची वीज वापरत आहेत.
...व्याजासह वसुली
सिडको एन-३, ४, सातारा- देवळाई, एन-७, हडको, सुरेवाडी, मुकुंदवाडी, रामनगर, कांचनवाडी, नक्षत्रवाडी, बंबाटनगर यासह बहुतांश वसाहतीत वीज गायब होते. पण, वीजबिल थकले की त्याला व्याज लावून महावितरण वसुली करते.
- हेमा पाटील
उन्हाळ्यात तरी वीजपुरवठा खंडित नको...
वादळी वाऱ्याच्या फटक्याने अजूनही महावितरणचे काम संपलेले नाही, असे सांगून दुरुस्तीसाठी वीज बंद केली जाते. परंतु, हा उकाडा कुटुंबाला सहन करावा लागतो. उन्हाळ्यात तरी वीजपुरवठा खंडित करू नये.
- सुभाष पांडभरे
बिघाड अन् दुरुस्ती...
उन्हाळ्यात वाढलेल्या मागणीमुळे वीजपुरवठा अनेकदा खंडित होतो. बिघाड दुरुस्तीसाठी फीडर बंद करावेच लागते. अधिक वेळ बंद झाल्यास जनतेला त्रासही होतो. त्यासाठी कोणते क्षेत्र विजेविना राहील, ते आम्ही जाहीर करतोच. जनतेने सुरळीत सेवेसाठी सहकार्य करावे.
- शांतीलाल चौधरी, अधीक्षक अभियंता, महावितरण