उन्हाळी ज्वारीला शेतकऱ्यांकडून प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:06 AM2021-03-26T04:06:17+5:302021-03-26T04:06:17+5:30
सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळ्यासह, भायगाव, बाभूळगाव बु., वरखेडी, निल्लोड, चिंचखेडा, गेवराई सेमी आदी परिसरामध्ये उन्हाळी ज्वारी आणि बाजरीला यावर्षी शेतकऱ्यांनी ...
सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळ्यासह, भायगाव, बाभूळगाव बु., वरखेडी, निल्लोड, चिंचखेडा, गेवराई सेमी आदी परिसरामध्ये उन्हाळी ज्वारी आणि बाजरीला यावर्षी शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले असून उन्हाळी कापूस हद्दपार केला आहे.
मागील वर्षी मोजक्याच शेतकऱ्यांनी उन्हाळी ज्वारीचे पीक घेतले होते. त्याचा त्यांना चांगला फायदा झाला होता. कापसाला मात्र बोंडअळीने चांगलाच तडाखा दिला होता. त्यामुळे यंदा उन्हाळी ज्वारी तसेच बाजरीच्या पेऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यंदा पाणीसाठा असल्याने शेतकऱ्यांना उत्पन्नाची आशा आहे. ज्वारी हे पीक खरिपामध्ये घेतले जात होते; परंतु दोन वर्षांपासून परतीचा पाऊस येत असल्याने ज्वारीचे पीक खराब होत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता खरिपाऐवजी उन्हाळ्यात हे पीक घेण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. सध्या अवकाळी पावसाचा जोर या भागात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सुरू आहे. तर तालुक्यातील काही भागांत गारांचा पाऊस पडल्याने अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
फोटो : सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळा परिसरामध्ये उन्हाळी ज्वारीचे पीक जोमात आले आहे.