औरंगााबाद विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूकीत निष्काळजीपणाचा गाठला कळस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2017 08:17 PM2017-11-23T20:17:35+5:302017-11-23T20:18:07+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेसाठी पहिल्या टप्प्यात शुक्रवारी (दि.२४) मतदान होत आहे.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेसाठी पहिल्या टप्प्यात शुक्रवारी (दि.२४) मतदान होत आहे. यासाठी १८ मतदान केंद्रावर कर्मचा-यांना प्रशिक्षण देऊन मतदान केंद्रातील साहित्य घेऊन जाण्यासाठी सकाळी आठ वाजता बोलावण्यात आले. मात्र नियोजनाच्या आभावामुळे मतदान केंद्राकडे शेवटचा कर्मचारी रात्री आठ वाजता विद्यापीठातुन बाहेर पडल्याचे सूत्रांनी सांगितले.
विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूकीतील गोंधळाची परंपरा मतदानाच्या दिवसापर्यंत कायम राहिली. प्रत्येक ठिकाणी नियोजनाचा आभाव असल्याचे दिसून आले. मतदानासाठी चार जिल्ह्यात ठरविलेल्या १८ मतदान केंद्रांवर केंद्रप्रमुख, मतदान अधिकारीसह इतर कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यात येणार होते. हे प्रशिक्षण सकाळच्या सत्रात दिल्यानंतर १२ वाजेच्या आत उस्मानाबाद जिल्ह्यातील मतदान केंद्रांकडे अधिकारी रवाना होण्याची नियोजन केले होते. मात्र प्रत्यक्षात मतदान केंद्रांवर कोण कोठे जाणार याचेच नियोजन केलेले नव्हते. जेव्हा कोणी कुठे जायचे असा प्रश्न उपस्थित झाला. तेथून पुढे नियोजनाची तयारी सुरु केली.
याशिवाय कर्मचा-यांना मतदान केंद्रावर कर्मचा-यांनी काय घेऊन जायचे याच्याही सुचना देण्यात आलेल्या नव्हत्या. यामुळे दुपारपर्यंत हाच गोंधळ राहिला. दुपारनंतर कर्मचाºयांना मतदानासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. यानंतर सायंकाळच्या वेळी कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना होण्यास सुरुवात झाली. मतदान केंद्रावर पाठविला जाणारा शेवटच्या कर्मचारी रात्री आठ वाजता विद्यापीठातुन बाहेर पडल्याचे समजते. शुक्रवारी सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे. यामुळे उमेदवारांचे प्रतिनिधींचे अर्ज, ओळखपत्र केव्हा तयार करुन देणार, सिसीटीव्ही यंत्रणा केव्हा बसवणार असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मतपत्रिका कमी पडल्या
विद्यापीठाने पुरेशा प्रमाणात मतपत्रिका छापल्याच नसल्याचे दुपारी समोर आले. यानंतर मतपत्रिका छापण्याच्या आॅर्डर देण्यात आल्या.या मतपत्रिका सायंकाळपर्यंत विद्यापीठ प्रशासनाला मिळाल्याचे समजते. यावरुन मतदानाविषयीचा निष्काळजीपणा स्पष्ट होते.
कुलगुरू दौ-यावरच
कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे एका बैठकीसाठी दिल्ली दौ-यावर आहेत. नविन विद्यापीठ कायद्यानुसार पहिल्यांदाच मतदान होत असल्यामुळे कुलगुरू विद्यापीठात असणे गरजेचे आहे. यातच कुलसचिवांनी पदभार घेतला त्यास आठवडा उलटला आहे. या परिस्थितीतही कुलगुरूंनी दौºयावर आहेत. गुरुवारी सायंकाळी उशिरा ते विद्यापीठात परतल्याचे समजते.
परिस्थिती अटोक्यात आहे. सर्व काही सुरळीत होईल. आवश्यक त्या सर्व बाबींची पुर्तता केली आहे. कोणतीही आडचण येणार नाही.
- डॉ.साधना पांडे, कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी